येत्या १५ दिवसांत जळगावातून विमानाने करा जीवाचा गोवा; DGCA कडून जळगाव विमानसेवेला हिरवा कंदील
By सचिन देव | Updated: March 6, 2024 20:12 IST2024-03-06T20:10:44+5:302024-03-06T20:12:48+5:30
डीजीसीएने जळगावहुन 'प्लाय ९१' विमान कंपनीला विमानसेवा सुरू करण्याची अंतिम परवानगी दिल्याने, जळगावकरांसाठी ही आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल.

येत्या १५ दिवसांत जळगावातून विमानाने करा जीवाचा गोवा; DGCA कडून जळगाव विमानसेवेला हिरवा कंदील
(लोकमत विशेष) जळगाव: केंद्र शासनाच्या उड्डाण योजने अंतर्गंत जळगाव विमानतळावरून पुण्यासह गोवा, हैदराबाद या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यासाठी `प्लाय ९१ ` या विमान कंपनीने पाठविलेल्या प्रस्तावाला भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात डीजीसीएने बुधवारी सायंकाळी परवानगी दिली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे संचालक विक्रम देव दत्त यांच्याकडुन `प्लाय ९१ ` या विमान कंपनीने महाव्यवस्थापक मनोज चाको यांनी दिल्ली येथे हे परवानगी पत्र स्वीकारले. परवानगी मिळाल्यानंतर आता येत्या पंधरा ते वीस दिवसात पहिल्यांदा गोव्याची विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली.
तीन वर्षांपूर्वी अहमदाबाद येथील 'ट्रू जेट या विमान कंपनीने जळगावहुन सुरू असणारी मुंबईची विमानसेवा अचानक बंद केल्यानंतर, तेव्हापासून जळगाव विमानतळावरून कुठल्याही विमान कंपनीतर्फे विमानसेवा सुरू करण्यात आलेली नव्हती. गेल्या वर्षी उड्डाण योजनेच्या तिसऱ्या राऊंडमध्ये नवीनच स्थापन झालेल्या 'प्लाय ९१' या विमान कंपनीने जळगावहून एकाचवेळी पुणे, गोवा व हैदराबाद या शहरात विमानसेवा सुरू तयारी दाखविल्यानंतर, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या विमान कंपनीला जुलैमध्ये परवानगी दिली होती. मात्र, डीजीसीएतर्फे विमान कंपनीला सेवा सुरू करण्याबाबत गेल्या वर्षी डिसेंबरपासून पाठविलेल्या प्रस्तावाला परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र, विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी डीडीसीएकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर, डीजीसीएतर्फे ६ मार्च रोजी `प्लाय ९१ `ला विमानसेवेची परवानगी देण्यात आली आहे.
तर सुरूवातीला गोव्याची सेवा सुरू होणार..
'प्लाय ९१' या विमान कंपनीतर्फे पुण्यासह, गोवा व हैदराबाद या शहरांमध्ये जळगावहुन विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली असून, कंपनीतर्फे सुरूवातीला पुण्याची विमानसेवा सुरू करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, पुण्यातील लोहगाव विमानतळ हे भारतीय वायुसेनेच्या ताब्यात असल्यामुळे, या ठिकाणी विमानाच्या लॅडिंगला वायुसेनेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे विमान कंपनीतर्फे पुण्याची परवानगी मिळेपर्यंत सुरूवातीला गोव्याची विमानसेवा चालविण्यात येणार आहे.
डीजीसीएने जळगावहुन 'प्लाय ९१' विमान कंपनीला विमानसेवा सुरू करण्याची अंतिम परवानगी दिल्याने, जळगावकरांसाठी ही आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. त्यामुळे विमान कंपनीतर्फे पंधरा ते वीस दिवसात सेवा करण्याची शक्यता आहे. सुरूवातीला पुण्यासाठी विमानसेवा सुरू न होता, गोव्यासाठी सुरू होणार आहे. कारण, पुण्यातील लोहगाव विमानतळ हे भारतीय वायुसेनेच्या ताब्यात असल्यामुळे, त्यासाठी केंद्राची विशेष परवानगी लागते. ती परवानगी मिळण्यासाठी कंपनीतर्फे प्रयत्न सुरू आहे. - सुमित कोठारी, अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर पर्यटन विकास फाऊंडेशन सिव्हिल एव्हिशन