आॅलिम्पिक आणि हिंद केसरीचे लक्ष्य
By admin | Published: March 18, 2017 12:48 AM2017-03-18T00:48:12+5:302017-03-18T00:48:12+5:30
विजय चौधरी : दुखापतीमुळे सराव तात्पुरता बंद
जळगाव : सराव करताना मानेला दुखापत झाल्याने सराव बंद आहे. दुखापत बरी झाल्यानंतर हिंद केसरी आणि २०२० टोकियो आॅलिम्पिकच्या पात्रता फेरीचे नियोजन करून पुन्हा सरावाला सुरुवात करू, असे तीनवेळचा महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याने सांगितले. तसेच नोकरीबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचेही तो म्हणाला.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जिमखाना डे निमित्त विजय चौधरी जळगावला आला असता लोकमतने त्याच्याशी संवाद साधला. विजय पुढे म्हणाला की,‘‘ मॅटवरची कुस्ती आणि मातीवरची कुस्ती यात फरक आहे. २०२० आॅलिम्पिक पात्रतेसाठी आधी राष्ट्रीय स्पर्धा, त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धांमध्ये उतरावे लागेल. त्यासाठी कठोर सराव करणे गरजेचे आहे.’’
राष्ट्रीय स्तरावर खेळताना पंजाब आणि हरयाणा या राज्यातील मल्लांचे आव्हान समोर असते. यावर तो म्हणाला की,‘‘ पंजाब आणि हरयाणा या राज्यात कुस्ती हा खेळ मोठ्या प्रमाणात पुढे नेला आहे. तेथे अनेक स्पर्धा या मॅटवरच होतात. आणि आपल्याकडे अनेक स्पर्धा अजूनही मातीवरच होतात. त्यामुळे मल्लांनी मॅटवरचा सरावदेखील करावा. ’’
‘‘मुख्यमंत्र्यांची सही, पण पदाची गुप्तताच’’
नोकरीबाबत विजय म्हणाला की,‘‘ वडिलांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने नोकरी मान्य केली. आता मुख्यमंत्र्यांनी माझ्या फाईलवर सहीदेखील केली. मात्र नेमके पद कोणते याबाबत गुप्तता बाळगण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी सांगितल्याचे विजय चौधरी म्हणाला.