बकरी, कुत्र्यांची शिकार करणारा बिबट्या मानवाच्या जीवावर का उठला?
By विलास.बारी | Published: November 30, 2017 05:47 PM2017-11-30T17:47:10+5:302017-11-30T17:52:13+5:30
बिबट्याचे खाद्य, रंग, शरीराचा आकार, शिकारीची अशी आहे तºहा
विलास बारी / आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.३० : चाळीसगाव वनक्षेत्रात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घालत सहा जणांचे बळी घेतले आहे. तसेच शेळी, मेंढी व घोडा अशा प्राण्यांवर हल्ला करीत ठार मारले आहे. बिबट्याच्या उपद्रवामुळे चाळीसगाव तालुका भयभीत असताना वनविभागाने नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी शार्प शुटरसह वनअधिकारी व कर्मचाºयांची गस्त सुरु केली आहे. मानवीवस्तीमध्ये शिरकाव करणाºया बिबट्याचे वैशिष्ट्य, त्याचे प्रकार, त्याचे खाद्य, शिकारीची पद्धत याबाबतची उत्सुकता मात्र कायम आहे.
बिबट्या, बिबळ्या किंंवा वाघरू हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे. परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे. बिबट्या व दक्षिण अमेरिकेतील जॅग्वार यांच्यात बरेच साम्य आहे. मात्र बिबट्या हा जॅग्वार पेक्षा आकाराने लहान असतो. बिबट्याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे बिबट्या की चित्ता असा सर्वसामान्य व्यक्तीचा गोंधळ होतो.
बिब्बा झाडाच्या बियांवरून बिबट्या नामकरण
महाराष्ट्रातील अनेक भागात बिब्बा नावाचे झाड आढळते. त्या झाडाच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठून ठिपके तयार होतात. यावरून मराठीत बिबट्या हे नाव पडले आहे. बिबटे चपळ शिकारी आहेत. त्यांचा जातकुळीतील इतर माजार्रांपेक्षा जरी ते आकारमानाने लहान असले तरी त्यांच्या मोठ्या कवटीमुळे त्यांना मोठ्या भक्ष्यांची शिकार करता येते. बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांमध्ये खूपच फरक आहे. भारतातून चित्ता हा प्राणी नामशेष होत असताना बिबट्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. चित्याचे ठिपके हे भरीव तर बिबट्याच्या शरीरावरील ठिपके हे पोकळ असतात.
अन् बिबट्या मानवी वस्तीत घुसू लागला
चित्याची शरीरयष्टी लांबसडक व अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते, तर बिबट्याची बहुधा मांजराप्रमाणेच भरीव असते.बिबटे मनुष्यवस्तीजवळ राहणे जास्त पसंत करतात. मनुष्यवस्तीजवळील कुत्रे, पाळीव प्राणी हे बिबट्याचे आवडते भक्ष्य असते. या भक्ष्याच्या शोधात ते गाव व शहराच्या हद्दीत घुसतात. त्यातून मानव आणि बिबट्या यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात होते. त्यातून आपल्या बचावासाठी बिबटे हे मानवावर हल्ला करू लागतात. त्यातून पुढे ते नरभक्षक होतात.
भक्ष्याच्या दर्जावर वजन तर प्रदेशानुसार रंग छटा
बिबट्यांच्या आकारमानामध्ये बरेच वैविध्य आढळते. दक्षिण अफ्रिकेतील, श्रीलंकेतील व तुर्कस्थानातील बिबट्याचे वजन ९० किलोपर्यंत, तर मध्यपूर्व वाळवंटी भागातील बिबट्याचे वजन २० किलोपर्यंत असते. ही वैविध्यता भक्ष्याच्या उपलब्धतेवर व दर्जावर अवलंबून असल्याचे मानले जाते. बिबट्याच्या ठिपक्यांमधे देखील विविधता असते. त्यांच्या पिवळ्या त्वचेमधे प्रदेशानुसार छटा असतात. पर्जन्यवनातील बिबट्यांची त्वचा गडद सोनेरी रंगाकडे झुकणारी असते. वाळवंटी भागातील बिबट्यांची त्वचा काहीशी फिकट असते, व थंड भागांमधे बिबट्याची त्वचा ही थोडी करडी असते.
त्वचेतील रंगद्रव्यामुळे बिबट्याची त्वचा काळी
काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रवे (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात. तर पांढºया वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्याची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात. काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त असतात. तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाममध्ये व नेपाळमध्ये आढळतात. आफ्रिकेमध्ये ते माउंट केनियाच्या जंगलांमध्ये आहेत.
बिबट्याच्या खाद्यामध्ये वैविध्यता
मोठ्या मार्जार जातीच्या बिबट्यांच्या खाद्यामधे जास्त वैविध्य असते. प्रांताप्रमाणे बिबट्याच्या खाद्यामधे बदल होतो. मात्र सर्व प्रांतातील बिबट्याचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी हे होय. पण ते माकडे, उंदरांसारखे प्राणी, उभयचर, पक्षी व किडेदेखील खातात. कधीकधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीसुद्धा खातात.
लहान आकारामुळे मोठी शिकार अशक्य
बिबट्या भारतात चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा व वानर यांची शिकार करतो. मात्र त्याला त्याच्या लहान आकारमानामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही. बिबट्या मोठे सांबर किंवा नर नीलगाय या भक्ष्यांची सहजासहजी शिकार करत नाही. वाघ किंवा इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो, अगदी गावांशेजारी सुद्धा. गाव व परिसरात राहणारे बिबटे हे बकºया, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात.
बिबट्याची अन्नसाखळी ही फार मोठी आहे. त्यामुळे तो केवळ कुत्रे किंवा बकरी, घोडा अशा प्राण्यांची शिकार करतो असे नाही. प्राप्त परिस्थितीनुसार शिकार करून बिबट्या आपली भूक क्षमवित असतो.
अभय उजागरे, मानद वन्यजीव संरक्षक, जळगाव.