श्रीमद् भगवद्गीतेत ईश्वरवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 05:56 PM2018-10-02T17:56:04+5:302018-10-02T17:56:17+5:30
भगवंताचे ज्ञान करुन देणारी जी सहा दर्शने आहे त्यात इतर दर्शनापेक्षा गीतेमध्ये ईश्वरवाद श्रेष्ठतम रुपाने प्रतिपादीत केलेला आहे. न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही षट्दर्शने जीवात्म्याच्या भल्यासाठीच आहे. पण त्यांच्यात ईश्वराचे वर्णन जास्त करुन होतच नाही. यापैकी न्यायदर्शनात जे काही होते ते ईश्वरेच्छेने होते. या प्रकाराने ईश्वराचा गौरव तर केलेलाच आहे पण जीवात्म्याला मुक्तीप्राप्त करण्यासाठी ईश्वराचे सहाय्य घ्यावेच लागते. ही गोष्ट ते ग्राह्य धरत नाही. ते २१ प्रकारच्या दु:खालाच व दु:ख विनाशालाच जीवात्म्याचे मुक्त होणे असे समजतात. वैशेषिक दर्शनात सुद्धा जीवात्म्याच्या कल्याणासाठी आवश्यकता दाखविली नाही तर अध्यात्मिक, अधिदैविक व अधिभौतिक या तिनही तापांचा नायनाट झालेला आहे. ही भूमिका प्रामुख्याने घेतलेली दिसून येते. ‘योग दर्शनात मुख्यत्वे करुन चित्तवृत्तींच्या निरोधाबद्दलच सांगितलेले आहे. चित्तवृत्तींच्या निरोधाने स्वस्वरुपामध्ये द्रष्ट्याची स्थिती होते. सांख्यदर्शन आणि पूर्व मीमांसा दर्शन तर जीवाच्या कल्याणासाठी ईश्वराचे अजिबात गरज नाही, असे समजतात. ‘उत्तर मीमांसा दर्शनातही ईश्वराबद्दल विशेषरुपाने काही उल्लेख आलेला आढळून येत नाही, पण उलट जीवात्मा आणि परमात्मा या दोघांच्या अभेदाबद्दल जास्त जोर दिला आहे. वैष्णव सांप्रदायांच्या आचार्यांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञानामध्ये परमेश्वराचे श्रेष्ठतम महत्व आहे असे मानले आहे.
गीतेत ईश्वरभक्ती मुख्यत्वे करुन आलेली आहे. अर्जुन जोपर्यंत भगवंताला अर्पण झाला नव्हता तोपर्यंत भगवंतांनी त्याला ‘गीतामृत’ पाजले नाही. ज्यावेळी अर्जुनाने नारायणरु पी भगवान श्रीकृष्णाची शरणागती पत्करली त्या आणि त्याच वेळी भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश करायला प्रारंभ केला. गीतेने सांगितल्या प्रमाणे कर्मयोगामध्ये सुद्धा ईश्वराची आज्ञापक रुपाने श्रेष्ठत्ता वर्णन केलेली आपल्याला आढळून येते.
अशा प्रकारे गीतेचा मूळपाठ करताना आपल्याला असे दिसते की, जीवात्म्याच्या मंगलतेसाठी परमात्मा परब्रह्म ईश्वराची नितांत आवश्यकता आहे.
-दादा महाराज जोशी