परमात्माच सर्वव्यापी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 06:55 PM2018-10-10T18:55:36+5:302018-10-10T18:55:55+5:30
अध्यात्म
अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मा या विषयाचे शास्त्र. अध्यात्म या शब्दात अधि अणि आत्मा हे दोन शब्द आहेत. अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीज्ञान होय. ‘अंतिम सत्य शोधून काढण्याच्या दृष्टीने केलेले अनुभवाचे मंथन’ अशीही अध्यात्मशास्त्राची व्याख्या आढळते. आपल्या अनुभवात येणारे जेवढे पदार्थ आहे, त्यातील नित्य काय व अनित्य काय हे शोधून काढण्याच्या दृष्टीने जे शास्त्र त्याकडे बघते ते अध्यात्म शास्त्र होय.
अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मज्ञानाचे शास्त्र आणि अध्यात्म दर्शन म्हणजे आत्म्याविषयी दर्शन होय. या दृष्य जगाला आधारभूत असलेल्या आत्मस्वरुपाचे तर्काचे आणि नंतर त्याचा साक्षात अनुभव घेणे याला अध्यात्म दर्र्शन म्हटले जाते.
अध्यात्मशास्त्राला पराविद्या असेही म्हणतात. हे तत्वज्ञान वेदामध्ये निर्माण होते व उपनिषदामध्ये पूर्ण होते. अध्यात्मशास्त्राच्या भांडारसाठी उपनिषदांना समजून घ्यायला हवे.
या नश्वर जगात अमृत कुठे आहे तर याचा शोध घेता घेता वैदिक ऋषींना एकंसत्चा साक्षात्कार झाला. एकच परमात्मा सर्वव्यापी आहे. वारकरी सांप्रदायात सांगायचे झाले तर ‘विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला म्हणजेच ‘सभूमिंवृरत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम्’ याचा साक्षात अनुभव घेणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. या अनुभवाप्रत ऋषी पोहोचले.
प्राचीन व अर्वाचीन ब्रह्मज्ञानी पुरुषांनी अध्यात्मशास्त्राची परंपरा आजतगायत टिकवून ठेवलेली आहे. थोर संतांची त्यावरील अढळ निष्ठा यामुळेच ही परंपरा अखंडपणे टिकली आहे.
संपूर्ण जगाला गवसणी घालणारे ज्याचे वर्णन करता येत नाही, ज्याचा कधीही विनाश होत अशा गोष्टीचा विचार करणे आणि त्या व्यक्त न होणाऱ्या गोष्टीतून निर्माण होणाºया व त्यातच पुन्हा लय पावणाºया या चराचर जगाचे ज्ञान करून घेणे यालाच वेदांतामध्ये अध्यात्मशास्त्र असे म्हणतात.
- दादा महाराज जोशी, जळगाव