सदैव जमिनीवर पाय असणारा देवमाणूस : ना. गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:21+5:302021-06-06T04:13:21+5:30
ना. गुलाबराव पाटील म्हणजे संघर्षाच्या धगधगत्या अग्निकुंडातून तावूनसुलाखून निघालेला तेजस्वी हिरा. अगणित विषारी काट्यांचा त्रास सोसून सर्वार्थाने नावाप्रमाणेच फुललेले, ...
ना. गुलाबराव पाटील म्हणजे संघर्षाच्या धगधगत्या अग्निकुंडातून तावूनसुलाखून निघालेला तेजस्वी हिरा. अगणित विषारी काट्यांचा त्रास सोसून सर्वार्थाने नावाप्रमाणेच फुललेले, जनसामान्यांच्या आयुष्यात आनंदाचा सुवास फुलविणारे देवदूतरूपी गुलाबपुष्प! अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे असणाऱ्या या व्यक्तित्वाचा प्रवास मात्र अगणीत काट्यांनी भरलेला आणि तेवढाच अचंबित आणि थक्क करणारा आहे. एखाद्या प्रेरणादायी चित्रपटाच्या कथानायकाला साजेसा, साधा कार्यकर्ता ते मंत्रिपदापर्यंतचा गुलाबराव पाटील यांचा जीवन प्रवास बघितल्यावर निश्चितच या व्यक्तीबद्दलचा आदर अधिकच द्विगुणित होतो.
५ जून रोजी ‘लाडली’ या छोट्याशा खेड्यात या संघर्षयोद्धाचा जन्म झाला. खरं तर संघर्ष हा तसा गुलाबभाऊंच्या पाचवीलाच पुजलेला म्हणावा लागेल. भाऊ सहा महिन्यांचे असतानाच त्यांचे मातृछत्र हरपले. त्यानंतर मावशींच्या छत्रछायेत लहानाचे मोठे होत त्यांचा जीवनप्रवास सुरू झाला. सर्वसाधारण परिस्थिती असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी ‘नशीब’ पान सेंटर सुरू केले असताना आपल्या कर्तृत्वशैलीच्या जोरावर सर्वार्थाने त्यांचे राजकीय नशीब उदयाला यायला सुरुवात झाली.
भाऊ हे १९८५ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत कार्यरत झाले. याच कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविला. विविध आंदोलनांमुळे गुलाबराव पाटील हे नाव जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रभर गाजायला सुरुवात झाली आणि तेथूनच आंदोलनाच्या तालमीतून या लोकनेत्याच्या तेजस्वी राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. सामान्य कार्यकर्ता ते मंत्री असा प्रवास त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्यांच्या सहकार्याने केला असून, आजही ही वाटचाल अविरतपणे सुरू आहे.
-ह.भ.प. गजानन महाराज, वरसाडेकर, अध्यक्ष, मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समिती, जि.जळगाव