सोने १० महिन्यांच्या निच्चांकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:15 AM2021-03-06T04:15:25+5:302021-03-06T04:15:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण सुरूच असून गुरुवार व शुक्रवार असे सलग दोन दिवस मोठी ...

Gold at 10-month low | सोने १० महिन्यांच्या निच्चांकीवर

सोने १० महिन्यांच्या निच्चांकीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण सुरूच असून गुरुवार व शुक्रवार असे सलग दोन दिवस मोठी घसरण पहायला मिळाली. या दोन दिवसात चांदी तब्बल तीन हजार ५०० रुपयांनी घसरुन ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. अशाच प्रकारे सोन्यातही एक हजार २०० रुपयांनी घसरण होऊन ते ४५ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले. गेल्या १० महिन्यातील सोन्याचे हे निच्चांकीवरील भाव आहे. ७ मे २०२० रोजी सोन्याने ४५ हजारांचा पल्ला ओलांडून ते ४६ हजारावर पोहचले होते.

गेल्या १० दिवसांतील दोन दिवसांचा अपवाद वगळता सोने-चांदीत सातत्याने घसरण सुरू आहे. दररोज घसरण होत असल्याने सोने मे महिन्यानंतर प्रथमच ४६ हजारांच्या खाली आले आहे.

सात महिन्यात सोन्यात १२ हजारांवर घसरण

गेल्या वर्षी २०२०मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये सुवर्ण बाजार बंद राहिला तरी मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये उलाढाल होत सोने-चांदी चांगलेच वधारले. यामुळे ७ मे २०२० रोजी सोने ४६ हजारांवर पोहचले होते. यात भाव वाढत जाऊन ते ऑगस्ट महिन्यांपर्यंत ५८ हजारांपर्यंत पोहचले होते. मात्र त्यानंतर सोने-चांदीचे भाव कमी-कमी होत गेले. त्यामुळे सात महिन्यात सोन्याच्या भावात १२ हजार ७०० रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या १० दिवसांपासूनही घसरण सुरूच असल्याने सोने ७ मेनंतर पुन्हा ४६ हजारांच्या खाली येऊन १० महिन्यांच्या निच्चांकीवर आले. ३ मार्च रोजी ४६ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ४ रोजी ७०० रुपयांची तर ५ रोजी आणखी ५०० रुपयांची अशी दोन दिवसात एकूण एक हजार २०० रुपयांनी घसरण होऊन ते ४५ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

अशाच प्रकारे चांदीच्याही भावात दोन दिवसात मोठी घसरण झाली. ३ मार्च रोजी ७० हजारांवर असलेल्या चांदीच्या भावात ४ रोजी एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर ५ रोजी पुन्हा दोन हजारांची अशी दोन दिवसात एकूण तीन हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

विशेष म्हणजे ५ मार्च रोजी डॉलरचे दर वधारून ते ७२.९४ रुपयांवर पोहचले तरीदेखील सोने-चांदीत घसरण झाली.

——————

लग्नसराई नसल्याने सध्या सोने-चांदीला फारसी मागणी नाही. त्यात सट्टाबाजारात मोठी उलाढाल होत असल्याने सोने-चांदीचे भाव कमी होत आहेत.

- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशन.

Web Title: Gold at 10-month low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.