बजेटनंतर लगेच सोने २८००, तर चांदी ३८०० रुपयांनी स्वस्त! घोषणेच्या अंमलबजावणीपूर्वीच बाजारात उत्साह

By विजय.सैतवाल | Published: July 23, 2024 03:28 PM2024-07-23T15:28:25+5:302024-07-23T15:29:04+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून सोने-चांदीवरील सीमाशुल्क कमी करण्याची मागणी सुवर्ण व्यावसायिकांकडून केली जात होती. अखेर ती मान्य झाली व मंगळवारी (२३ जुलै) केंद्रीय अर्थसंकल्पात तशी घोषणा होऊन सीमाशुल्क १२.५ टक्क्यांवरून ६.५ टक्के करण्यात आले.

Gold 2800 and silver 3800 cheaper immediately after the budget Excitement in the market even before the implementation of the announcement | बजेटनंतर लगेच सोने २८००, तर चांदी ३८०० रुपयांनी स्वस्त! घोषणेच्या अंमलबजावणीपूर्वीच बाजारात उत्साह

बजेटनंतर लगेच सोने २८००, तर चांदी ३८०० रुपयांनी स्वस्त! घोषणेच्या अंमलबजावणीपूर्वीच बाजारात उत्साह


जळगाव : सुवर्ण बाजारासाठी ऐतिहासिक असा सीमाशुल्क कपातीचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित होताच त्याच्या अंमलबजावणीपूर्वीच सोने-चांदीच्या भावात मोठ्या घसरणीला सुरुवात झाली. या घोषणेने सोने सोमवार, २२ जुलैच्या तुलनेत मंगळवारी (२३ जुलै) दोन हजार ८०० रुपयांनी घसरून ते ७० हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले. तसेच चांदी तीन हजार ८०० रुपयांनी घसरून ८५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली आहे. सुवर्ण बाजारातील या वेळची ही घसरण उत्साह घेऊन येणारी असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळी असलेल्या भावात अर्थसंकल्पानंतर घसरण होऊन सोने-चांदीचे भाव दोन वेळा बदलले.

गेल्या अनेक वर्षांपासून सोने-चांदीवरील सीमाशुल्क कमी करण्याची मागणी सुवर्ण व्यावसायिकांकडून केली जात होती. अखेर ती मान्य झाली व मंगळवारी (२३ जुलै) केंद्रीय अर्थसंकल्पात तशी घोषणा होऊन सीमाशुल्क १२.५ टक्क्यांवरून ६.५ टक्के करण्यात आले. या घोषणेच्या अंमलबजावणीनंतर सोन्याचे दर सरासरी पाच हजार तर चांदीचे दर सरासरी सात हजारांनी कमी होऊ शकतात.

मात्र अंमलबजावणीपूर्वीच या घोषणेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (२३ जुलै) सोने-चांदीचे भाव कमी होण्यास सुरूवात झाली. सोमवारी (२२ जुलै) सोने ७३ हजार ५०० रुपये होते. मंगळवारी सकाळी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी ते ७२ हजार १०० रुपयांवर आले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यात पुन्हा एक हजार ४०० रुपयांची घसरण होऊन ते थेट ७० हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले. एकूणच सोमवारच्या तुलनेत ते तीन हजार ८०० रुपयांनी कमी झाले.
दुसरीकडे समोवारी ८९ हजार ३०० रुपये प्रति किलोवर असलेली चांदी मंगळवारी सकाळी अर्थसंकल्पापूर्वी ८८ हजार रुपये प्रति किलोवर आली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यात पुन्हा दोन हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ८५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

भाववाढीला ‘ब्रेक’, साडेतीन महिन्यातील नीच्चांकी भाव
मार्च-एप्रिल महिन्यापासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढून नवनवीन उच्चांकी गाठत होते. मात्र आता सरकारच्या एका घोषणेने मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे मंगळवारचे भाव पाहता ते साडेतीन महिन्यातील नीच्चांकी भाव आहे. या पूर्वी ६ एप्रिल रोजी सोने ७१ हजार १०० रुपये होते, त्यानंतर ते वाढतच गेले होते. तसेच चांदीचेही मंगळवारचे भाव सव्वादोन महिन्यातील नीच्चांकी भाव असून या पूर्वी १६ मे रोजी चांदी ८६ हजार रुपये प्रति किलोवर होती. त्यानंतर तिचे भाव वाढतच गेले होते.

Web Title: Gold 2800 and silver 3800 cheaper immediately after the budget Excitement in the market even before the implementation of the announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.