विक्रम : सोने तब्बल ५५,८००, चांदी ७१ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 03:23 AM2020-08-06T03:23:10+5:302020-08-06T03:23:59+5:30
विक्रम : सोन्यात ९००, तर चांदीत साडेतीन हजारांनी एकाच दिवसात वाढ
जळगाव : सोने-चांदीच्या व्यवहारात सट्टा बाजार तेजीत आल्याने या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढून सोन्याने ५५ हजाराचाही टप्पा ओलांडून ते ५५ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. अशाच प्रकारे चांदीनेही ७० हजारांचा टप्पा ओलांडून ती ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे अमेरिकन डॉलरचे दर कमी झाले तरी बुधवारी (दि. ५ ) या दोन्ही धातूंचे भाव वाढले आहेत. दरम्यान, या मोठ्या भाववाढीमुळे सुवर्ण व्यावसायिकही चिंतित झाले आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याचा फायदा घेत दलालही सक्रिय होऊन सट्टा बाजार तेजीत आला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीत अचानक वाढ तर कधी घसरण होत आहे. चार दिवसांपासून मात्र भाव तेजीच येत असल्याचे चित्र आहे.
भाववाढीचा सलग दुसरा महिना
जुलै महिन्यापासून सोने-चांदीचे भाव वाढतच जाऊन नवनवे विक्रम गाठले गेले. याच महिन्यात सोन्याने ५० हजाराचा टप्पा ओलांडला. त्यानंतर आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनही पुन्हा वाढच होत आहे. यामध्ये
१ आॅगस्ट रोजी सोन्याच्या भावात ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ५४ हजार ७०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर सोमवारी सुवर्णबाजार सुरू होताच सोने व चांदी या दोन्हीमध्ये पुन्हा भाववाढ झाली. यात सोन्याच्या भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५४ हजार ९०० रुपये प्रतितोळा झाले. त्यानंतर बुधवार, ५ आॅगस्ट रोजी त्यात पुन्हा ९०० रुपयांनी वाढ होऊन सोन्याने ५५ हजारांचा टप्पा ओलांडला व ते ५५ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. अशाच प्रकारे १ आॅगस्ट रोजी चांदीतही ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ६६ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. बुधवार, ५ आॅगस्ट रोजी तर त्यात थेट साडेतीन हजार रुपये प्रतिकिलोने वाढ होऊन चांदीने ७० हजारांचा टप्पा ओलांडला व ती ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.
अमेरिकन डॉलरचे दर वाढल्यास सोने-चांदीचेही दर वाढतात. मात्र बुधवारी ३८ पैशांनी डॉलरचे दर घसरून ते ७४.९० रुपयांवर आले तरी सोने-चांदीचे भाव वाढले. सट्टाबाजार तेजीत आल्याने ही भाववाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सुवर्ण व्यावसायिक चिंतित
सोने-चांदीतील भाववाढीने सुवर्ण व्यावसायिकही चिंतित झाले आहेत. सोने-चांदीचे भाव वाढत गेल्यास या व्यावसायिकांना जेवढा माल असेल त्यासाठीचा फरक भरावा लागतो. किमान १० टक्के ही रक्कम असते. ज्याच्याकडे १०० किलो सोने घेऊन ठेवलेले असेल तो व्यावसायिक पाच कोटी रुपये कसा भरणार, असा प्रश्न व्यावसायिकांपुढे उभा राहत आहे. सध्या सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने एवढी रक्कम कशी उभी करावी, अशी चिंताही सुवर्ण व्यावसायिकांना सतावत आहे.