सोने पुन्हा ६२ हजारांच्या उंबरठ्यावर ३०० रुपयांची वाढ, चांदीही वधारू लागली
By विजय.सैतवाल | Published: November 21, 2023 06:23 PM2023-11-21T18:23:42+5:302023-11-21T18:23:56+5:30
सोमवारी ३०० रुपयांची झालेली वाढ मंगळवारीही कायम
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या पाच दिवसांपासून सोन्याचे भाव पुन्हा वधारू लागले असून मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी त्याच्या भावात ३०० रुपयांची वाढ होऊन ते ६१ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. तसेच चांदीच्या भावात सोमवारी ३०० रुपयांची झालेली वाढ मंगळवारीही कायम असल्याने चांदी ७४ हजार ३०० रुपयांवर पोहोचली आहे.
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात २५० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा २०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र त्यानंतर १६ नोव्हेंबारपासून सोन्याचे भाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली व ते ६१ हजार रुपयांवर पोहचले. दुसऱ्या दिवशी १७ रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली व सोने ६१ हजार ५०० रुपयांवर पोहचले. तीन दिवस हे भाव स्थिर राहिल्यानंतर मंगळवार, २१ रोजी त्यात ३०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६१ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.
अशाच प्रकारे चांदीच्याही भावात दोन दिवसात ३०० रुपयांची वाढ झाल्याने ती सोमवार, २० नोव्हेंबर रोजी ७४ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचली. मंगळवारी याच भावावर ती स्थिर राहिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर गंतवणूक वाढू लागल्याने ही भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.