एक्झिट पोलनंतर सोने-चांदी गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:51 AM2019-05-22T11:51:47+5:302019-05-22T11:52:25+5:30
शेअर मार्केटमध्ये गंगाजळीने रुपयांत सुधारणा
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजानंतर शेअर मार्केटने उसळी घेतल्याने भारतीय रुपयांत सुधारणा झाली आहे. यामुळे सोने-चांदीच्या भावात मात्र घसरण झाली असून एक्झिट पोलनंतर सोन्याचे भाव एकाच दिवसात ३०० रुपये प्रती तोळा तर चांदी ५०० रुपये प्रती किलोने घसरून सोने ३२ हजार ३०० रुपये प्रती तोळा तर चांदी ३८ हजार ५०० रुपये प्रती किलोवर आली आहे. विशेष म्हणजे ३३ हजाराच्या उंबरठ्यावर असलेले सोने ऐन लग्न सराईत सहा दिवसात ६०० रुपयांनी कमी झाले आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने-चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यात आता देशातील लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचाही यावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मुंबई शेअर बाजारासह निफ्टीने चांगलीच उसळी घेतली. यात सेन्सेक्स १४२२ अंकांनी वधारला तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ६४ पैशांनी सुधारणा झाली त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला. एक्झिट पोलचे अंदाज जाहीर होण्यापूर्वी १९ रोजी ७०.३४ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे भाव २० रोजी ६९.६० रुपयांवर आले. याचा परिणाम म्हणून सोनेही एकाच दिवसात ३०० रुपये प्रती तोळ््याने घसरून ३२ हजार ६०० रुपयांवरून ३२ हजार ३०० रुपयांवर आले.
एकाच दिवसात दोन भाव
एरव्ही सोन्याच्या भावात चढ-उतार होताना ते एक दिवस उलटल्यानंतर होतात. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर मार्केट, भारतीय रुपया यावर परिणाम होताना सोमवारी एकाच दिवसात सोन्याचे भाव बदलले. सकाळी बाजार उघडला त्या वेळी सोने ३२ हजार ५०० रुपये प्रती तोळा होते. त्यानंतर दुपारी शेअर मार्केट वाढत गेले व रुपयादेखील सुधारला आणि याच दिवशी दुपारी सोन्यात २०० रुपये प्रती तोळ््याने घसरण होऊन ते ३२ हजार ३०० रुपयांवर आले. मंगळवारीदेखील ते याच भावावर कायम होते.
विदेशी गंगाजळीचा परिणाम
भारतीय शेअर बाजारात विदेशी गंगाजळी वाढल्याने विदेशात सोन्याचे भाव घसरले व दुसरीकडे भारतीय रुपया सुधारत या दुहेरी परिणामामुळे सोने घसरल्याचे जाणकारांनी सांगितले.
सहा दिवसात ६०० रुपयांनी घसरण
गेल्या आठवड्यात भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने सोन्याचे भाव वाढत जाऊन ते३२हजार९००रुपयांवरपोहचले. ३३ हजाराच्या उंबरठ्यावर सोने असताना ऐन लग्नसराईत एक्झिट पोलच्या अंदाजाने सोने पुन्हा गडगडले.
चांदीतही घसरण
सोन्यासोबतच चांदीच्या भावावरही याचा परिणाम झाला असून चांदीत ५०० रुपये प्रती किलोने घसरली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजापूर्वी ३९ हजार रुपये प्रती किलो असलेली चांदी या अंदाजानंतर ३८ हजार ५०० रुपयांवर आली आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढण्यासह भारतीय रुपयात सुधारणा झाल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन