भाजपच्या मुसंडीनंतर सोने-चांदीत घसरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:54 AM2019-05-26T11:54:23+5:302019-05-26T11:54:53+5:30

शेअर मार्केटमध्ये गंगाजळीने रुपयांत सुधारणा

Gold and silver prices slid after BJP plunged | भाजपच्या मुसंडीनंतर सोने-चांदीत घसरगुंडी

भाजपच्या मुसंडीनंतर सोने-चांदीत घसरगुंडी

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र दिसू लागताच शेअर मार्केटने उसळी घेतल्याने व भारतीय रुपयाही वधारल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. निवडणुकीचे निकाल येऊ लागताच सोने प्रती तोळा १०० रुपये तर चांदी ५०० रुपये प्रती किलोने घसरून सोने ३२ हजार २०० रुपये प्रती तोळा तर चांदी ३८ हजार रुपये प्रती किलोवर आली आहे. विशेष म्हणजे निकालाविषयी एक्झिट पोलच्या अंदाजानंतर घसरण झाली व त्या पाठोपाठ निकालानंतरही घसरण कायम राहिली.
आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने-चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यात आता देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचाही यावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. २३ रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागताच विदेशी गुंतवणुकीचा कल मुंबई शेअर बाजाराकडे वळला व विदेशी गंगाजळी वाढल्याने शेअर बाजाराने उसळी घेतली. यामुळे विदेशात सोने-चांदीचे भाव कमी झाले. या सोबतच भारतीय रुपयातही सुधारणा होऊन हे भाव कमी होण्यास मदत मिळाली. लोकसभेचे निकाल जाहीर होण्याच्या दिवशी २३ रोजी सकाळी ६९.६४ रुपये असलेले अमेरिकन डॉलरचे भाव २४ रोजी ६९.५२ रुपयांवर तर २५ रोजी ते ६९.३८ रुपयांवर आले. याचा परिणाम म्हणून सोन्याचे भाव कमी होऊन ३२ हजार ३०० रुपयांवरून ३२ हजार २०० रुपयांवर आले. या सोबतच चांदीतही एकाच दिवसात ५०० रुपये प्रती किलोने कमी होऊन ती ३८ हजार ५०० रुपयांवरून ३८ हजार रुपये प्रती किलोवर आली.
नऊ दिवसात ७०० रुपयांनी घसरण
नऊ दिवसांपूर्वी १५ मे रोजी भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने सोन्याचे भाव वाढत जाऊन ते ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचले होते. ३३ हजाराच्या उंबरठ्यावर सोने असताना ऐन लग्नसराईत एक्झिट पोलच्या अंदाजाने सोने पुन्हा गडगडले व त्या वेळी सोन्याचे भाव ३२ हजार ३०० रुपयांवर आले होते. आता निकालानंतर पुन्हा घसरण होऊन हे भाव ३२ हजार २०० रुपयांवर आले आहे. शनिवारीदेखील हेच भाव कायम होते.
विदेशी गंगाजळीचा परिणाम
भारतीय शेअर बाजारात विदेशी गंगाजळी वाढल्याने विदेशात सोन्याचे भाव घसरले व दुसरीकडे भारतीय रुपया सुधारत या दुहेरी परिणामामुळे सोने घसरल्याचे जाणकारांनी सांगितले.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढण्यासह भारतीय रुपयात सुधारणा झाल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन

Web Title: Gold and silver prices slid after BJP plunged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव