धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने-चांदी दर घसरले; खरेदीची सुवर्णसंधी

By विलास बारी | Published: November 9, 2023 08:26 PM2023-11-09T20:26:56+5:302023-11-09T20:29:24+5:30

सोन्यात ४०० तर चांदीत ५०० रुपयांची घसरण : सुवर्णपेढ्यांमध्ये मोठी गर्दी.

gold and silver rate fell on the eve of dhantrayodashi 2023 a golden buying opportunity | धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने-चांदी दर घसरले; खरेदीची सुवर्णसंधी

धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने-चांदी दर घसरले; खरेदीची सुवर्णसंधी

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : विजयादशमी पाठोपाठ धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने चांदीच्या भावात पुन्हा एकदा घसरण झाली असून यामुळे ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे. गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले. यामुळे सोने ६१ हजार रुपयांच्या आत आले आहे. तसेच चांदीच्याही भावात ५०० रुपयांची घसरण झाली व ती ७१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली आहे.

नवरात्रोत्सवापासून सुरू असलेला सुवर्णखरेदीचा उत्साह अद्यापही कायम असून धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला देखील ‘सुवर्णनगरी’ गजबजून गेली होती. विशेष म्हणजे यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तापूर्वीच घसरण झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सोने ६२ हजार रुपयांच्या पुढे गेले होते, तर चांदी देखील ७३ हजार रुपयांवर पोहोचली होती. मात्र हे भाव कमी-कमी होत गेले. त्यात आता तीन दिवसात सोन्याचे भाव ७५० रुपयांनी कमी झाले आहे. ६ नोव्हेंबर रोजी सोने ६१ हजार ४५० रुपयांवर होते ते कमी होऊन ८ नोव्हेंबर पर्यंत ६१ हजार १०० रुपयांवर आले. ९ नोव्हेंबर रोजी त्यात पुन्हा ४०० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. अशाच प्रकारे चांदीचे देखील भाव कमी होऊन तीन दिवसात ती ९५० रुपयांनी घसरली आहे.

जळगावातील सोने देशभर प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. त्यात यंदा अधून मधून सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. मात्र विजयादशमीच्या मुहूर्तावर व त्यानंतर आता पुन्हा भाव कमी झाल्याने त्याचा लाभ घेत खरेदीला वेग आला आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदीला मोठे महत्त्व असल्याने या दिवशी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होणार आहे.

धनत्रयोदशीला सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होईल असा अंदाज आहे. त्यात एक दिवस अगोदरच भाव कमी झाल्याने खरेदी अधिक वाढू शकते. - स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

यंदा मुहूर्तावर सोन्याचे भाव कमी होत असल्याने त्याचा लाभ ग्राहक घेत आहेत. त्यामुळे खरेदी वाढून दरवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक खरेदी होऊ शकते. पुढील महिन्यापासून लग्नसराई सुरू झाल्यास सोने-चांदीचे भाव वाढू शकतात. त्यामुळे आता ग्राहक सुवर्णपेढ्यांकडे वळले आहेत. - आकाश भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक

Web Title: gold and silver rate fell on the eve of dhantrayodashi 2023 a golden buying opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.