सुवर्ण झळाली, सुवर्णनगरी जळगावात अक्षय्यतृतीयेला सोन्याची दुप्पट विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:02 PM2018-04-19T13:02:40+5:302018-04-19T13:02:40+5:30
दुपारनंतर सराफ दुकानांमध्ये गर्दी
विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १९ - साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेला सुवर्णनगरी जळगावात सोन्याला दुप्पट मागणी राहून तब्बल १० कोटींच्यावर उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रति तोळा ६०० रुपये भाववाढ होऊन सोने ३१ हजार ७०० रुपयांवर गेले तरी सोन्याला मागणी वाढून चांगलीच झळाळी आली.
अक्षय्यतृतीयेला सोने खरेदीला अनन्य महत्त्व असल्याने जळगावात सोने खरेदीसाठी या दिवशी मोठी गर्दी होत असते. यंदाही असे सुखद चित्र पहावयास मिळाले.
भाववाढनंतरही मागणीत वाढ
गेल्या आठवड्यात सोने ३१ हजार १०० रुपये प्रति तोळा होते. त्यानंतर त्यात ५०० रुपयांनी वाढ होऊन ते ३१ हजार ६०० रुपयांवर गेले. गेल्या दोन दिवसात पुन्हा यात वाढ झाली. १६ एप्रिल रोजी ३१ हजार ६०० रुपये असलेले सोन्याचे भाव १७ रोजी ३१ हजार ७०० रुपये झाले व १८ रोजी अक्षय्यतृतीयेच्या दिवशीदेखील ते ३१ हजार ७०० रुपयांवर स्थिर राहिले. अमेरिका व सिरीया यांच्यातील तणावामुळे सोन्याच्या भावात आठवडाभरात ६०० रुपयांची वाढ होऊन अक्षय्यतृतीयेला सोने ३१ हजार ७०० रुपये प्रति तोळा असले तरी विक्रीवर कोणताही परिणाम न होता विक्रीत उलट दुप्पट वाढ झाल्याचे शहरातील प्रमुख ज्वेलर्सच्यावतीने सांगण्यात आले. या प्रमुख सराफी दुकानांसह एकूण १५० फर्ममध्ये एकूण किती उलाढाला झाली याचा नेमका आकडा सांगणे कठीण असले तरी १० कोटींच्यावर विक्री झाल्याचे जाणकार सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
दुपारी वाढली गर्दी
सोने खरेदीसाठी सकाळपासूनच ग्राहकी सुरू होती. मात्र दुपारी १२ नंतर गर्दी वाढत गेली. आजच्या मुहूर्तावर नवीन दागिने खरेदी तर झालीच सोबतच या मुहूर्तावर खरेदी केलेले सोने अक्षय राहते, अशी श्रद्धा असल्याने दागिने घ्यायचे नसले तरी किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी केले पाहिजे, याकडेही मोठा कल होता. त्यामुळे सुवर्ण बाजारात मोठी उलाढाल दिसून आली.
दागिन्यांमध्ये शॉर्ट पोतला पसंती दिली जात होती. त्या सोबतच गळ््यातील चैन (सुवर्ण साखळी), मंगळसूत्र, कर्णफुले, बांगड्या, अंगठी यांचीही खरेदी झाली. या दिवशी सोने घेऊन ठेवायचे म्हणून सोन्याचे शिक्के, तुकडे यांचीही ग्राहकी होती.
जळगाव शहरात सराफ दुकानांची संख्या १५०च्यावर आहे. यात प्रमुख दुकानामध्ये सोन्याचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येते. यामध्ये १०० ते २०० रुपयांची तफावत असते.
अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठा उत्साह राहिला. दुपारी १२नंतर गर्दी वाढून आज दुकानात पाय ठेवायलादेखील जागा नव्हती, एवढा ग्राहकांचा प्रतिसाद राहिला.
- अजयकुमार ललवाणी, संचालक, महावीर ज्वेलर्स, जळगाव.
अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला. नेहमीपेक्षा आज सोने खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी झाली होती.
- मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर.सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव.
दररोजपेक्षा आज सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. नेहमीपेक्षा आज दुप्पट विक्रीचा अंदाज आहे.
- भागवत भंगाळे, संचालक, भंगाळे गोल्ड, जळगाव.
जळगावात सोने खरेदीस ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. आज सकाळपासूनच ग्राहकी सुरू झाली होती. दुपारनंतर ग्राहकीमध्ये चांगलीच वाढ झाली.
- सतीश कुबेर, विक्री प्रमुख, पी.एन. गाडगीळ अॅण्ड सन्स, जळगाव.