धनत्रयोदशीला सोन्याला ‘झळाली’, मागणी वाढल्याने एकाच दिवसात सोन्याचे भाव ७०० रुपयांनी वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 11:56 AM2019-10-26T11:56:46+5:302019-10-26T11:57:41+5:30

रात्रीपर्यंत सुवर्णपेढ्यांमध्ये मोठी गर्दी

Gold 'burned' to Dhanatrodashi | धनत्रयोदशीला सोन्याला ‘झळाली’, मागणी वाढल्याने एकाच दिवसात सोन्याचे भाव ७०० रुपयांनी वधारले

धनत्रयोदशीला सोन्याला ‘झळाली’, मागणी वाढल्याने एकाच दिवसात सोन्याचे भाव ७०० रुपयांनी वधारले

Next

जळगाव : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव येथे सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होऊन करोडो रुपयांची उलाढाल झाली. नवरात्रोत्सवापासून सुरू असलेला सुवर्णखरेदीचा उत्साह अद्यापही कायम असून धनत्रयोदशीला ‘सुवर्णनगरी’ गजबजून गेली होती. दरम्यान, २५ आॅक्टोबर रोजी एकाच दिवसात सोन्याच्या भावात ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन सोने ३९ हजार ५०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. चांदीच्याही भावात एक हजार तीनशे रुपये प्रती किलोने वाढ झाली.
रात्रीपर्यंत गर्दी
जळगावातील सोने देशभर प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. त्यात यंदा भाव कधी नव्हे एवढे वाढले तरी सोन्याची मागणी कायम आहे. नवरात्रोत्सवापासून सोने खरेदीला झालेली सुरुवात अद्यापही कायम असून धनत्रयोदशीला सोने खरेदीला मोठे महत्त्व असल्याने या दिवशी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी ११ वाजेपासून सुवर्णपेढींमध्ये मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली, ती रात्रीपर्यंत कायम होती.
सर्वच प्रकारच्या अलंकारांना मागणी
शहरात सोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून आली. धनत्रयोदशीला सोने खरेदी करायची असल्याने अनेकांनी जुन्या दागिन्यांची मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर दागिने करण्यास पसंती दिली. या सोबतच अनेकांनी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करून ठेवले. शहरातील १५०च्या वर असलेल्या सुवर्ण पेढींमधून उलाढालीचा नक्की आकडा मिळाला नसला तरी करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
एकाच दिवसात मोठी वाढ
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण झाली की सोन्याचे भाव वधारतात. मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी डॉलरचे भाव ७१ रुपयांवरून घसरुन ७०.८६ रुपयांवर आला तरी सोन्याचे भाव वधारले. प्रचंड मागणी वाढल्याने हे भाव वाढल्याचे सांगण्यात आले. २४ आॅक्टोबर रोजी ३८ हजार ८०० रुपये प्रती तोळ््यावर असलेल्या सोन्याच्या भावात एकाच दिवसात ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढून हे भाव ३९ हजार ५०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. सोबतच चांदीचेही भाव एकाच दिवसात १३०० रुपये प्रती किलोने वाढून ते ४७ हजार ५०० रुपयांवरून ४८ हजार ८०० रुपयांवर पोहचले.

धनत्रयोदशीला सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. सकाळपासून असलेली गर्दी रात्रीपर्यंत कायम होती. विशेष म्हणजे सोने-चांदीचे भाव एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात वाढले.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

Web Title: Gold 'burned' to Dhanatrodashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव