अंगणात झाडू मारणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:16 AM2021-04-02T04:16:24+5:302021-04-02T04:16:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अंगणात झाडू मारत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून लताबाई साहेबराव पाटील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अंगणात झाडू मारत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून लताबाई साहेबराव पाटील (७५) यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीची अडीच तोळ्याची सोनसाखळी तोडून पलायन केल्याची घटना कोल्हे नगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरुवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉ.किरण पाटील यांच्याकडे सासू लताबाई पाटील या वास्तव्याला आहेत. बुधवारी सायंकाळी प्रा.डॉ. किरण पाटील महाविद्यालयात तर पत्नी सुनीता बाजारात गेलेल्या होत्या. त्यावेळी मुलगी शुभ्रा व सासू लताबाई असे दोघेच घरी होते. सायंकाळी झाडू मारत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी लताबाई यांच्याजवळ दुचाकी थांबवली. एक जण उतरून लताबाई यांच्याजवळ आला तर दुसऱ्याने दुचाकी काही अंतरावर नेली. त्यावेळी पत्ता विचारण्याचा बहाणा करून आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधत एकाने लताबाई यांच्या गळ्यातील सोनसाखळी तोडली. त्यात अर्धी अंगावर राहिली तर अर्धी सोनसाखळी घेऊन चोरटे शिवकाॅलनीच्या दिशेने पसार झाले. लताबाई यांनी आरडाओरड केली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. प्रा.किरण पाटील यांनी रात्री रामानंद नगर पोलिस ठाणे गाठून घटना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यानंतर उशिरा गुरुवारी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.