उच्चशिक्षित व सधन कुटुंबातील तरुणीने लांबविली सोनसाखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:16 PM2019-10-07T12:16:12+5:302019-10-07T12:16:54+5:30
फुले मार्केटमधील घटना : अंगावर केमिकल टाकले, बोदवडची युवती अटकेत
जळगाव : फुले मार्केटमध्ये खरेदी करीत असलेल्या पूजा ओमप्रकाश व्यास (रा.बालाजी पेठ) या वकील तरुणीच्या पाठीवर व मानेवर केमिकल टाकून गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबविणाऱ्या हर्षदा किशोर महाजन (रा.बोदवड) या उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला लोकांनी पाठलाग करुन पकडल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता घडली. हर्षदा ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात बीबीएमच्या दुसºया वर्षाला शिक्षण घेत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीपेठ येथे वास्तव्यास असलेल्या अॅड पूजा ओमप्रकाश व्यास या रविवारी दुपारी १ वाजता बहिण आरती सोबत फुले मार्केट येथे खरेदीसाठी आल्या होत्या. दोन्ही बहिणी खरेदी करुन एका ड्रायफूट दुकानासमोरुन पायी चालत असताना तोंडाला स्कार्प बांधलेल्या एका तरुणीने पूजा व आरती या दोघांच्या मानेवर केमिकल टाकले. यानंतर मानेवर आग व्हायला लागल्याने पूजा मागे वळून पाहत नाही तोच केमीकल टाकणाºया तरुणीने पूजा यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडली व तेथून पळ काढला.
वडील बागायतदार शेतकरी, काका पंचायत समिती सदस्य
संशयित तरुणीला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी तिची चौकशी केली असता या तरुणीचे वडील बागायतदार शेतकरी असून ८० एकर शेती आहे, तसेच काका पंचायत समितीचे सदस्य आहेत.
उच्च घराण्यातील ही तरुणी असून दोन दिवसापूर्वीच आईने तिला साडे पाच हजार रुपये दिले होते, तरीही तिने चोरीचा प्रकार केला, त्यामागे काय कारण असू शकते याचा पोलीस तपास करीत आहेत.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न
सोन्याची साखळी माझीच आहे, धक्का लागला म्हणून वाद झाला, मी चोर नाही, असे म्हणत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मला सोडा, माझ्या घरी सांगू नका, अशा विनवण्यात ती करीत होती.पोलिसांनी दम भरल्यावर तिने खरी माहिती दिली.
कवयित्री बहिणीबाई विद्यापीठात बीबीएमच्या दुसºया वर्षाला शिक्षण घेत आहे व तेथेच वसतीगृहात राहत असल्याचे तिने सांगितले.
दरम्यान, या तरुणीला अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी तीची आरोग्य तपासणी करण्यात आली.
चोर...चोर...ऐकताच पोलिसही धावले
गळ्यातील साखळी तोडल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पूजा यांनी चोर...चोर...पकडा...पकडा अशी आरडाओरड करत सोनसाखळी लांबविणाºया तरुणीचा पाठलाग केला. हाके च्या अंतरावर असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे सुनील पाटील, भरत ठाकरे, सुधीर सावळे, प्रणेश ठाकूर, रवींद्र साबळे, नवजीत चौधरी यांनी घटनास्थळाकडे धाव घेत तरुणीला पाठलाग करुन ताब्यात घेतले. तिच्या हातात पूजा यांची साडे पाच ग्रॅमची २० हजार रुपये किमतीची लांबविलेली पोत मिळून आल्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर तक्रार देण्यासाठी पूजा बहिणीसह शहर पोलीस ठाण्यात आली.
वकील तरुणीवर ठेवली पाळत; कारण अस्पष्ट
पूजा यांची बहिणी आरती हिने सांगितल्यानुसार संशयित हर्षदा ही दोन ते तीन दुकानांवर खरेदी असतांना लक्ष ठेवून होती. दोन्ही बहिणींच्या गळ्यात सोनसाखळी होती. संधी मिळताच तिने दोघांच्या अंगावर केमिकल्स टाकले आणि गळ्यातील साखळी तोडून पळ काढला. पूजासह बहिणी आरती हिला केमिकल टाकलेल्या ठिकाणी प्रचंड आग होत असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पूजा व्यास यांच्या फिर्यादीवरुन हर्षदा हिच्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी तिच्या वसतीगृहात जावून तिच्या खोलीचीही झडती घेतली. महागडे कपडे, बुट असा तिचा वावर असून तिने चोरी का केली याचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.