पहूर पेठ ग्रामसभेत करदात्यांना सुवर्णमुद्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:20 AM2021-08-27T04:20:48+5:302021-08-27T04:20:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पहूर, ता. जामनेर : तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण कर भरणाऱ्या तीन करदात्यांची निवड करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पहूर, ता. जामनेर : तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण कर भरणाऱ्या तीन करदात्यांची निवड करण्यात आली. त्यांना पसंती क्रमांकानुसार सुवर्णमुद्रा देऊन गौरव करण्यात येणार आहे.
कोरोनानंतर प्रथमच ग्रामसभेचे पेठ ग्रुपग्रामपंचायतीने आयोजन केले. अध्यक्षस्थानी सरपंच नीता रामेश्वर पाटील होत्या. यादरम्यान सर्व शासकीय कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पेठ ग्रामपंचायतीने १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च यादरम्यान कर भरणा-यांसाठी सोन्याच्या नाण्याची योजना जाहीर केली होती. त्याप्रमाणे नियमित व पूर्ण कर भरणाऱ्या १३८ करदात्यांमधून तीन भाग्यवंत करदात्यांची लकी ड्राॅ पद्धतीने निवड करण्यात आली. यात पंडित भावडू सोनार एक ग्रॅम, पुंजाजी ओंकार कलाल दोन ग्रॅम व प्रवीण विश्वनाथ जाधव यांना तीन ग्रॅम याप्रमाणे निवड करण्यात आली. सभेला हे करदाते हजर नव्हते. त्यामुळे त्यांना नंतर सुवर्णमुद्रा देण्यात येणार आहेत.
नागरी सुविधांसह अतिक्रमणाच्या प्रश्नांवरून काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला. यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावरून थोडा वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यात अशोक पाटील, आर.बी. पाटील, राजधर पांढरे यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले.
यादरम्यान अंगणवाडीसेविका यांना दप्तरवाटप करण्यात आले. वसुंधरा अभियान अंतर्गत ५० लाखांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी यावर सर्वानुमते चर्चेअंती मंजूर करण्यात आला. प्रदीप लोढा यांची संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी निवड झाल्याने सन्मान करण्यात आला.
यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष प्रदीप लोढा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, उपसरपंच श्यामराव सावळे, रामेश्वर पाटील, ॲड. संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी डी.पी. टेमकर, अरुण घोलप, शरद पांढरे, रवींद्र मोरे, संजय तायडे, किरण पाटील, गणेश पांढरे, चेतन रोकडे, ईश्वर देशमुख, मिनाज शेख, इक्रिमोद्दीन समसोद्दीन यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.