सोन्यात ९०० तर चांदीमध्ये ७०० रुपयांनी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:33 PM2019-09-07T12:33:41+5:302019-09-07T12:34:14+5:30
खरेदीऐवजी मोडचे प्रमाण वाढल्याचे परिणाम
जळगाव : उच्चांकीवर पोहचलेल्या सोने-चांदीच्या खरेदीऐवजी मोडचे प्रमाण वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर या धातूंची मागणी घटत आहे. परिणामी सोने-चांदीच्या भावात घसरण होत असून सुवर्णनगरी जळगावात शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात सोन्याचे भाव ९०० रुपये प्रती तोळ््याने कमी ते ३८ हजार ६०० रुपयांवर तर चांदीचे भाव ७०० रुपये प्रती किलोने कमी होऊन ४९ हजार ३०० रुपयांवर आले आहेत. मागणी कमी होण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणादेखील होत असल्याने भाव कमी होण्यास मदत मिळत आहे.
रशिया व चीनने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढल्याने तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात होत असलेल्या घसरणीमुळे मे महिन्यापासून सोन्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. जून महिन्यापासून तर ही वाढ अधिकच होत गेली.
मोडचे प्रमाण वाढले
सहा वर्षांपूर्वी ३५ हजारावर पोहचलेल्या सोन्याचे भाव या वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात वाढत गेले. ३२ हजार, ३३ हजार, ३४ हजार असा टप्पा पार करता-करता सोने ३९ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. दुसरीकडे चांदीचीही अशीही स्थिती राहत ४० हजार रुपये प्रती किलो ते ५० हजार रुपयांचा प्रवास चांदीचा झाला. ही वाढ होत असताना अधिक भाव वाढणार या आशेने खरेदीही जोरात सुरू राहिली. मात्र आता उच्चांकीवर पोहचलेल्या भावात या दोन्हीही धातूंची खरेदीऐवजी मोडकडे अनेकांचा कल वाढत आहे. ज्या ठिकाणी एका सुवर्ण दालनात एका दिवसात १० तोळे सोन्याची व एक किलो चांदीची मोड होत असे तेथे आता २० तोळे सोन्याची व २ ते ३ किलो चांदीची मोड होऊ लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून खरेदी घटल्याने ६ सप्टेंबर रोजी सोने-चांदीचे भाव घसरले.
रुपयात सुधारणा
गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाच्या तुलनेत वाढत गेलेल्या अमेरिकन डॉलरचे भावही कमी होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. ३ सप्टेंबर रोजी डॉलरचा दर ७२.१४ रुपयांवर गेला होता. तो ४ रोजी ७१.९८ रुपये, ५ रोजी ७१.९३ रुपये व ६ रोजी ७१.६८ रुपयांवर आला आहे. त्यामुळेही सोने-चांदीचे भाव कमी होत आहे. ५ सप्टेंबर रोजी ५० हजार रुपये प्रती किलोवर असलेल्या चांदीच्या भावात ६ रोजी ७०० रुपये प्रती किलोने घसरण होऊन ती ४९ हजार ३०० रुपयांवर आली. तसेच सोन्याच्याही भावात ९०० रुपये प्रती तोळेने घसरण होऊन ते ३८ हजार ६०० रुपयांवर आले आहे.
बदल करण्याचे प्रमाण ‘जैसे थे’
भाव कमी झाले किंवा वाढले तरी जुने सोने-चांदी देऊन नवीन दागिने घेण्याऱ्यांना भावातील चढ-उताराचा काही परिणाम होत नसल्याचेही चित्र सुवर्ण बाजारात आहे. कारण जुने दागिने देऊन केवळ मजुरी द्यावी लागत असल्याने बदल दागिने घेण्याऱ्यांचे प्रमाण ‘जैसे थे’ आहे.
सोने-चांदीचे भाव उच्चांकीवर पोहचल्याने त्या भावात खरेदी होण्याऐवजी मोडकडे कल वाढत असल्याने मागणी कमी झाली. परिणामी सोने-चांदीच्या भावात घसरण होत आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणाही झाल्याने भाव कमी होण्यास मदत होत आहे.
- किशोर सुराणा, सुवर्ण व्यावसायिक.
जास्त दिवस वापरून झालेले जुने दागिने बदलून घेण्यासाठी मजुरीच द्यावी लागत असल्याने भावातील चढ-उताराचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे दागिने बदलून घेण्यावर काही परिणाम नाही.
- मनोहर पाटील, जळगाव.
सोने-चांदीचे भाव वाढत असल्याने या जास्त भावात खरेदी करण्यापेक्षा मोड दिल्यास अधिक फायदा होतो. त्यामुळे जुन्या दागिन्यांची मोड दिली जात आहे.
- भरत पाटील, ग्राहक.
पूर्वी घेतलेले दागिने वापरून झाल्याने तसेच बचत म्हणून घेऊन ठेवलेल्या सोने-चांदीची वाढीव भावात मोड दिल्याने फायदाच होणार असल्याने मोडकडे कल आहे.
- विनायक जाधव, ग्राहक.