सोन्यात ६०० तर चांदीत एक हजाराने घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:03+5:302021-02-16T04:18:03+5:30
जळगाव : दहा दिवसांपूर्वी भाववाढ झालेल्या सोन्यो-चांदीच्या भावात पुन्हा घसरण होत असून, सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या भावात ६०० ...
जळगाव : दहा दिवसांपूर्वी भाववाढ झालेल्या सोन्यो-चांदीच्या भावात पुन्हा घसरण होत असून, सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ४८ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले, तसेच चांदीच्याही भावात एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ७० हजार रुपये प्रति किलोवर आली.
१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या भावात सलग पाच दिवस घसरण झाली होती. मात्र, सहाव्या दिवशी ६ फेब्रुवारी रोजी एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७० हजार रुपयांवर पोहोचली होती. तेव्हापासून ती याच भावावर स्थिर होती. मात्र, बुधवार, १० फेब्रुवारी रोजी चांदीत पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ झाली व ती ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. त्यानंतर, सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी एक हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ७० हजार रुपये प्रति किलोवर आली.
अर्थसंकल्पानंतर सोन्यात मात्र काहीसा चढ-उतार सुरू होता. ९ रोजी ४९ हजार रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १० फेब्रुवारी रोजी १०० रुपयांनी घसरण होऊन ते ४८ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यानंतर, १५ रोजी तर थेट ६०० रुपयांनी घसरण होऊन सोने ४८ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले.