सुवर्ण झळाळी फिकी, सोने-चांदीच्या ‘अक्षय्य’ खरेदीत खंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:21+5:302021-05-15T04:15:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेला सुवर्णनगरी जळगावात सलग दुसऱ्या वर्षी सोने चांदीच्या खरेदीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेला सुवर्णनगरी जळगावात सलग दुसऱ्या वर्षी सोने चांदीच्या खरेदीत खंड पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण पेढ्या बंद असल्याने अक्षय्यतृतीयेची खरेदी खंडित झाल्याने जवळपास तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
अक्षय्यतृतीयेला सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जळगावात सोने खरेदीसाठी या दिवशी मोठी गर्दी होत असते. मात्र, गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग पसरला व गेल्या वर्षानंतर यंदाही पुन्हा अक्षय्यतृतीयेची खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे सुवर्ण व्यावसायिक चांगलेच हवालदिल झाले आहेत. जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे यंदाही दोन महिन्यांपासून सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतर ब्रेक द चेन आता ३१ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली. यात सुवर्ण पेढ्यादेखील बंद आहेत. जनता कर्फ्यू, निर्बंध यामुळे अनेक दिवस सुवर्ण पेढ्या उघडल्याच नाहीत. परिणामी यंदाचे सुवर्ण खरेदीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तानंतर अक्षय्यतृतीयेचा मुहूर्तही बंदमध्येच गेला.
सलग दुसऱ्या वर्षी खंड
सोने खरेदीसाठी विजयादशमी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा व अक्षय्यतृतीया या सणांच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात प्रधान्य दिले जाते. यातही अक्षय्यतृतीयेला खरेदी केलेले सोने अक्षय्य असते अशी सर्वांचीच भावना आहे. त्यामुळे या दिवशी सोन्यात मोठी उलाढाल होते. किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी करण्यावर भर असतो. मात्र, कोरोनामुळे जळगावातील सुवर्ण बाजाराच्या दीडशे वर्षांच्या परंपरेत अक्षय्य सोने खरेदीत खंड पडला आहे.
अक्षय्यतृतीयेला होते दुप्पट विक्री
सोने खरेदीसाठी जळगावात अशी नेहमीच गर्दी असते. एरवी एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होत असते; मात्र अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर ही उलाढाल दुप्पट तीन कोटींच्यावर जाते, त्यानुसार यंदा ही उलाढाल ठप्प झाली.
कमोडिटी बाजारात झळाळी
सुवर्ण पेढ्या बंद असल्या तरी कमोडिटी बाजारात सोन्याची मोठी उलाढाल होत आहे. त्यात अक्षय्यतृतीयेच्या पार्श्वभूमीवर अधिक झळाळी येत आहे. सध्या खरेदीचे प्रमाण ६० टक्के असून, विक्री केवळ २८ टक्केच आहे. तसेच १२ टक्के थांबलेल्या व्यवहारांचे प्रमाण आहे. कमोडिटी बाजारात सोन्याचे भाव ४७ हजार ७०० रुपये प्रति तोळा असून, चांदी ७१ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
अक्षय्यतृतीयेला सोने खरेदीला मोठे महत्त्व असल्याने या दिवशी जळगावात सोन्याची मोठी उलाढाल होते. मात्र, गेल्या वर्षी व आता यावर्षी देखील निर्बंधांमुळे सुवर्ण पेढ्या बंद आहेत. त्यामुळे सुवर्ण खरेदी विक्री होऊ शकली नाही. यात सुवर्ण व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असून व्यवसायासाठी काही वेळ तरी दुकाने उघडण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे.
- सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक, जळगाव