सोन्याची ३२ हजाराकडे झेप, दोन वर्षांनंतर पुन्हा उच्चांकीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:26 AM2018-04-28T11:26:51+5:302018-04-28T11:26:51+5:30
वर्षभरात सहा हजार रुपयांनी वाढ
विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - अमेरिका व सिरियातील तणावाच्या वातावरणामुळे डॉलरचे भाव दिवसेंदिवस वधारत असल्याने त्याचा सोन्याच्याही भावावर परिणाम होत असून दोन वर्षानंतर सोने पुन्हा ३२ हजार रुपये प्रति तोळ््याच्या दिशेने झेप घेत आहे. सुवर्णनगरी जळगावात २७ एप्रिल रोजी सोन्याचे भाव ३१८०० रुपयांवर पोहचले. आठवडाभरात सोने ३२ हजार रुपयांवर पोहचेल असा अंदाज सराफ व्यावसायिकांकडून वर्तविला जात आहे. दरम्यान, वर्षभरातच सोन्याच्या भावात सहा हजार रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे.
सुवर्ण अलंकरांना मोठी मागणी असलेल्या भारतात सोन्याची इतर देशांमधून आयात होत असते. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होतो. त्यानुसार आताही पुन्हा अमेरिका व सिरिया यांच्यातील तणावाच्या स्थितीमुळे सोन्याच्या भावावर परिणाम होत आहे. या घडामोडींमुळे अमेरिकी डॉलरचे भाव वाधारून २७ रोजी डॉलरचे भाव ६६.७४ रुपयांवर पोहचले. डॉलरच्या या वाढत्या भावामुळे सोन्याचेही भाव गेल्या तीन आढवड्यांपासून सातत्याने वाढत आहे.
अक्षय्यतृतीयेच्या पूर्वीपासूनच वाढ
अक्षय्यतृतीयेच्या एक आठवडापूर्वी सोने ३१ हजार १०० रुपये प्रति तोळा होते. त्यानंतर त्यात ५०० रुपयांनी वाढ होऊन ते १६ एप्रिल ३१ हजार ६०० रुपयांवर गेले. १७ रोजी पुन्हा १०० रुपयांनी वाढ होऊन ३१ हजार ७०० रुपये झाले व १८ रोजी अक्षय्यतृतीयेच्या दिवशीदेखील ते ३१ हजार ७०० रुपयांवर स्थिर राहिले. तेव्हा पासून सुरू झालेली ही भाववाढ कायम असून आता तर सोने ३१ हजार ८०० रुपयांवर पोहचले आहे. तत्पूर्वी ५ एप्रिल रोजी सोन्याचे भाव ३१ हजार रुपये होते. या महिन्यात तीन आठवड्यात हे भाव ८०० रुपये प्रति तोळ््याने वाढले आहे.
आठवडाभरात ३२ हजारावर
सोन्याचे भाव ३१ हजार ८०० रुपये झाले असले तरी जळगावात ग्राहकी कायम आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे आयातीवर परिणाम होऊन मागणी जास्त असल्याने भाव वाढत आहे. आठवडाभरात सोने ३२ हजारावर पोहचेल, असे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सहा हजार रुपयांची वाढ
गेल्या वर्षी उन्हाळ््यामध्ये ऐन लग्न सराईत सोन्याचे भाव २५ हजार ८०० रुपये असे तीन वर्षाच्या निच्चांकीवर आले होते. त्यानंतर यात वाढ होत गेली व वर्षभरात सोन्याच्या भावात तब्बल सहा रुपये प्रति तोळ््याने वाढ झाली आहे.
दोन वर्षापूर्वी होते ३२ हजार रुपये भाव
गेल्या वर्षी २५ हजार ८०० रुपये असे निच्चांकीवर असलेले सोने दोन वर्षापूर्वी ३२ हजार रुपये प्र्रति तोळा होते. त्यानंतर त्यात घसरण झाल्यानंतर ते ३२ हजारापर्यंत पोहचले नव्हते. मात्र भाववाढ कायम असल्याने आता पुन्हा सोने ३२ हजाराकडे झेप घेत आहे.
काही दुकानांवर ३२ हजारावर भाव
जळगावात १५०हून अधिक सुवर्णपेढ्या असून मोठ्या दालनांमध्ये ३२ हजाराच्या आत सोने आहे तर काही दुकानांवर सोने ३२ हजारापेक्षा जास्त भावावर आतापासूनच पोहचले आहे.
अमेरिका व सिरिया यांच्यातील तणावाच्या स्थितीमुळे सोन्याच्या भावावर परिणाम होत आहे. आठवडाभरात सोने ३२ हजार रुपये प्रति तोळ््यावर पोहचेल, असा अंदाज आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ असोसिएशन
सततच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे भाव वाढत आहे. काही दुकानांवर सोने ३२ हजारांवर पोहचले आहे.
- गौतमचंद लुणिया, अध्यक्ष, जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन