चाळीसगावातील कलाशिक्षकाच्या विज्ञान प्रकल्पाला राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:48 PM2021-02-28T17:48:56+5:302021-02-28T17:51:19+5:30
अमोल सुभाष येवले यांनी सादर केलेल्या शैक्षणिक साहित्याला राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक अमोल सुभाष येवले यांनी विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीयस्तरावर टाकाऊ साहित्यातून टिकाऊ असे शैक्षणिक साहित्य सादर केले होते. या शैक्षणिक साहित्याला राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळाले आहे.
मानवी डोळा हा प्रकल्पाचा विषय होता. दहावी विज्ञानाच्या अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन प्रकल्प सादर केला. संपूर्ण भारतातून एकूण २ हजार ५७६ प्रकल्प सहभागी झाले होते. भारतातून १४ प्रकल्प निवडले गेले. भारतातून पाच प्रकल्पांना सुवर्णपदक मिळाले. यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील कला शिक्षक यांचा समावेश आहे.
चाळीसगावचे शैक्षणिक साहित्य निर्मितीत एक वेगळी ओळख असलेले, गणित, विज्ञान, भूगोल या विषयातील उत्तम शैक्षणिक साहित्य निर्मितीत नावाजलेले, आपल्या कलेचा वेगळा ठसा उमटवणारे अमोल सुभाष येवले यांच्या या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळाले.
रमन सायन्स ॲण्ड टेकनॉलॉजी फाऊंडेशन, नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर सायन्सटिस्ट, इंडिया, ए. पी. जे. अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायन्सटिस्ट आयोजित इंडीयन सायन्स टेक्नो फेस्टिवल - आयएसटीएफ २०२१ इनोव्हेटिव्ह टीचिंग लर्निंग मटेरियल (टीएलएम) / मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धा २२ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन घेण्यात आली. नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट, इंडियाच्यावतीने सर्टिफिकेट ऑफ मेम्बरशिप देण्यात आली.