दीक्षांत समारंभातील सुवर्णपदके, प्रमाणपत्र मिळणार महाविद्यालयांकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:09+5:302021-06-24T04:13:09+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९ व्या दीक्षांत समारंभातील सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांची सुवर्णपदके व ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९ व्या दीक्षांत समारंभातील सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांची सुवर्णपदके व प्रमाणपत्र संबंधित विद्यार्थ्यांना हस्तांतरीत करण्यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्य, परिसंस्थांचे संचालक तसेच विद्यापीठ प्रशाळांचे संचालक यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. हे सुवर्णपदके व प्रमाणापत्र मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ दूरदृश्य प्रणाली व्दारा ३ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारंभात विविध अभ्यासक्रमाची सुवर्णपदके जाहीर करण्यात आली होती. सुवर्णपदक धारक विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व प्रमाणपत्र देण्यासाठी महाविद्यालये, परिसंस्था, प्रशाळा यांच्या प्राचार्यांकडे विद्यापीठाकडून हस्तांतरीत करण्यात आली असून हे सुवर्णपदके विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयाने द्यावयाची आहे.
प्रमाणपत्रेही पाठविली...
दरम्यान, गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रेदेखील महाविद्यालयांना पाठविण्यात आली असून ती संबंधित विद्यार्थ्यांना देण्यात यावे अशा सूचनांचे पत्र सर्व संबंधित महाविद्यालये, परिसंस्था, प्रशाळा यांना देण्यात आले आहे. तेव्हा सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी सुवर्णपदक, प्रमाणपत्र व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक यांनी केले आहे.