महिनाभरात सोन्याचे भाव दोन हजाराने घसरले, रुपया वधारत असल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:36 PM2019-04-03T12:36:55+5:302019-04-03T12:37:40+5:30
चांदीही अडीच हजाराने उतरली
जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्याने सोन्याच्या भावामध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे. महिनाभरात सोन्याचे भाव दोन हजार रुपये प्रती तोळ््याने कमी होऊन ते ३४ हजारावरून ३२ हजारावर आले आहेत. चांदीचे भाव कमी होऊन ते ४१ हजार ५०० रुपयांवरून ते ३९ हजारावर आले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाल्याने तसेच सोन्याच्या तुलनेत शेअर बाजारात गुंतवणूक वाढत असल्याने हा परिणाम झाला असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने- चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाल्याने भारतातही सोन्याचे भाव कमी झाले आहेत. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत महिनाभरात भारतीय रुपया तीन रुपयांनी वधारला आहे. गेल्या महिन्यात ७२ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे भाव ६९.०२ रुपयांवर आले. त्यामुळे सोन्याचे भाव महिनाभरापासून दररोज कमी होत आहे.
गेल्या महिन्यापासून घसरण सुरूच
अमेरिकन डॉलर उच्चांकीवर पोहचून ७२ रुपये प्रती डॉलर भाव झाल्याने २६ फेब्रुवारी रोजी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. त्यानंतर डॉलरचेही भाव कमी होत गेल्याने सोन्याचे भाव घसरत जावून मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ते ३३ हजारावर आले. त्यानंतर पुन्हा भाव कमी होत गेले व ९ मार्च रोजी हे भाव ३३ हजाराच्या खाली येऊन ते ३२ हजार ८०० रुपयांवर आले. तेव्हापासून दररोज भाव कमी होत जाऊन २५ मार्च रोजी ३२ हजार ७०० रुपयांवर आले. ही घसरण अशीच सुरू राहून २९ मार्च रोजी सोने ३२ हजारावर आले. त्यानंतर तीन दिवस हे ३२ हजारावर कायम राहिले व २ एप्रिल रोजी त्यात ३०० रुपयांनी वाढ होऊन सोने ३२ हजार ३०० रुपये प्रती तोळा झाले.
सोन्यासोबतच चांदीचेही भाव कमी होत आहे. महिनाभरात हे भाव थेट अडीच हजार रुपये प्रती किलोने कमी झाले आहेत. २६ फेब्रुवारी रोजी ४१ हजार ५०० रुपये प्रती किलो असलेल्या चांदीच्या भावात घसरण होऊन ती ९ मार्च रोजी ४१ हजार रुपये प्रती किलोवर आली.
त्यानंतर पाच दिवसात थेट एक हजार रुपये प्रती किलोने चांदीचे भाव कमी होऊन १४ मार्च रोजी चांदीचे भाव ४० हजार रुपये प्रती किलो झाले. ही घसरण कायम राहत २४ मार्च रोजी ३९ हजार ५०० रुपये प्रती किलो व २९ मार्च रोजी ३९ हजारावर चांदी आली. तेव्हापासून २ एप्रिलपर्यंत हे भाव ३९ हजारावर स्थिर आहेत.
शेअर बाजारात गुंतवणूक वाढली
सध्या सोन्याच्या तुलनेत शेअर बाजारात गुंतवणूक वाढल्याने सोन्याचे भाव कमी होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही हीच स्थिती असल्याने अमेरिकेतही सोन्याचे भाव कमी झाल्याने त्याचा फायदा भारतीय ग्राहकांना होत आहे.
ग्राहकी कायम
सोन्याचे भाव कमी-कमी होत असले तरी लग्नसराईसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या सोने-चांदीच्या मागणीत कोणतीही घट झालेली नाही. सध्या सुवर्णपेढ्या ग्राहकांनी गजबजलेल्या असून कमी झालेल्या भावाचा ग्राहक पुरेपूर फायदा घेत असल्याचे चित्र आहे.
खरेदीच्या हंगामात भावात घसरण
एरव्ही मागणी वाढली की कोणत्याही वस्तूचे भाव वधारतात. त्यानुसार सोन्याचेही भाव वाढत असतात. असे असले तरी सध्या लग्न सराईमुळे सोने-चांदीचा मोठी मागणी असली तरी त्यांचे भाव कमी होत आहे, हे विशेष.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्यामुळे सोन्याचे भाव कमी होत आहे. सध्या लग्नसराईमुळे सोने-चांदीला चांगली मागणी असून खरेदीवर परिणाम नाही.
-अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, शहर सराफ असोसिएशन, जळगाव.