एकाच दिवसात सोन्याच्या भावात ५०० रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:09 PM2018-04-13T12:09:31+5:302018-04-13T12:09:31+5:30
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम
विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १३ - अमेरिका व उत्तर कोरियातील तणावाच्या वातावरणामुळे डॉलरचे भाव वधारल्याने त्याचा सोन्याच्याही भावावर परिणाम होत असून सुवर्णनगरी जळगावात एकाच दिवसात सोन्याचे भाव प्रति तोळा ५०० रुपयांनी वाधारले. १० एप्रिल रोजी ३११०० रुपये असणारे सोन्याचे भाव ११ रोजी ३१६०० रुपये झाले व १२ रोजीदेखील ३१६०० रुपयांवर स्थिर राहिले. दरम्यान, सोन्याचे भाव वाढले असले तरी सुवर्णनगरीत सोन्याची ग्राहकी कायम असल्याचे चित्र आहे.
सुवर्ण अलंकरांना अनन्य महत्त्व असलेल्या भारतात सोन्याची इतर देशांमधून आयात होत असते. त्यामुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होत असतो. त्यानुसार आताही पुन्हा अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यातील तणावाच्या स्थितीमुळे सोन्याच्या भावावर परिणाम होत आहे. या घडामोडींमुळे अमेरिकी डॉलरचे भाव वाधारून १२ रोजी डॉलरचे भाव ६५.२७ रुपयांवर पोहचले. डॉलरचे भाव वाढल्याने सोन्याचेही भाव वाढण्यास वाव असल्याने दोन दिवसात सोन्याच्या भावांनी चांगलीच मुसंडी मारली.
एकाच दिवसात मोठी वाढ
गेल्या आठवड्यात ५ एप्रिल रोजी ३१००० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात एका दिवसात ६ रोजी १०० रुपयांनी वाढ होऊन ते ३११०० रुपयांवर पोहचले व सलग चार दिवस ते याच भावावर स्थिर राहिले. त्यानंतर ११ एप्रिल रोजी यात थेट ५०० रुपये प्रति तोळ््याने वाढ झाली व सोने ३१६०० रुपयांवर पोहचले. ही वाढ एका दिवसापूरता असू शकते, असे व्यापाऱ्यांना वाटत असताना दुसºया दिवशी १२ रोजीदेखील हे भाव ३१६०० रुपयांवर स्थिर राहिले.
ग्राहकी कायम
सध्या लग्न सराईमुळे सोन्याला चांगली मागणी असल्याचे चित्र आहे. अचानक सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असली तरी सुवर्णनगरीत सोन्याची ग्राहकी कायम आहे. सध्या लग्नसराईचीच जास्त खरेदी असल्याने ही खरेदी आवश्यक मानून खरेदीवर परिणाम नसल्याचे सांगितले जात आहे.
आणखी भाववाढीची शक्यता
पुढील आठवड्यात अक्षयतृतीयेचा मुहूर्त असल्याने या काळात सोन्याची मागणी वाढते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा हा परिणाम कायम राहिल्यास सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे.
अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यातील तणावाच्या स्थितीचा परिणाम होऊन डॉलरचे भाव वाढले आहे, त्यामुळे सोन्याच्याही भावत वाढ झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
- गौतमचंद लुणिया,अध्यक्ष,जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन.