दोनच दिवसात सोन्याच्या भावात ९०० रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:40 PM2019-06-22T12:40:59+5:302019-06-22T12:41:26+5:30
३४ हजार २००वर पोहचले सोने
जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची मागणी वाढल्याने सोने चांगलेच वधारले आहे. दोनच दिवसात सोन्याच्या भावात ९०० रुपये प्रती तोळ््याने वाढ झाली. यात गुरुवारी ७०० रुपये प्रती तोळा वाढ झाली. सोन्याचा भाव ३३,३०० वरुन आता ३४,२०० रुपयांवर पोहचला आहे. गेल्या अनेक वर्षानंतर एकाच वेळी झालेली ही मोठी वाढ ठरली आहे. यासोबतच चांदीच्या भावातदेखील वाढ होऊन ती ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली आहे.
सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. एरव्ही डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सुधारत गेला की सोन्याचे भाव कमी होतात. या वेळी गेल्या आठवड्यापासून रुपयात सुधारणा होत असली तरी सोन्याचे भाव वाढत गेले. यात अमेरिका व इंग्लंडमध्ये सोन्याचे भाव वाढल्याने त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होऊन मोठी बाजारपेठ असलेल्या भारतातही सोन्याच्या भावात वाढ झाली. यामुळे चार महिन्यांनंतर सोने पुन्हा एकदा प्रती तोळा ३४ हजार रुपयांच्या पुढे गेले आहे.
दलाल सक्रीय
चार महिन्यांपूर्वी अमेरिकन डॉलर उच्चांकीवर पोहचून ७२ रुपये प्रती डॉलर भाव झाल्याने २६ फेब्रुवारी रोजी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. त्यानंतर त्यात घसरण होत गेली. या वेळी डॉलरचे भाव कमी (६९.५४ रुपये) असले तरी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दलाल सक्रीय झाल्याने अचानक कृत्रिम मागणी वाढली व सोन्याला झळाली आल्याचे जाणकारांनी सांगितले.
दोन दिवसात मोठी वाढ
६ जून रोजी गुरुपुष्यामृताच्या योगावर सोन्याचे भाव ३३ हजार १०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर दोन आठवड्यांपासून सोन्यात चढ उतार होत राहिला. मात्र १९ जून रोजी ३३ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात एकाच दिवसात ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढ झाली व २० जून रोजी सोने ३४ हजारांवर पोहचले. त्यानंतर ही वाढ सुरूच राहून २१ रोजी पुन्हा २०० रुपयांनी वाढ होऊन सोने ३४ हजार २०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले आहे.
सुवर्ण महोत्सवाचा परिणाम
आंतरराष्ट्रीय पातळीवर सराफ व्यावसायिकांकडून सुवर्ण महोत्सव आयोजनाची तयारी असल्याने त्या वेळी सोन्याला मोठी मागणी वाढणार आहे. त्यामुळे दलाल याचा फायदा घेण्याच्या तयारीत असून त्यांनी सोन्याची खरेदी वाढवून भाववाढीसही हातभार लावत असल्याचे जाणकारांनी सांगितले.
चांदीतही तेजी
सोन्या सोबतच चांदीच्याही भावात वाढ होऊन ती ३८ हजार ५०० रुपयांवरून ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याला अचानक मागणी वाढल्याने सोन्याचे भाव वाढले आहेत. तसे आता डॉलरचे दर वाढले नसले तरी सोन्यात वाढ झाल्याने दलाल सक्रीय होत असल्याचे हे संकेत आहेत.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.