आठवडाभरात सोन्याच्या भावात १२०० रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:56 PM2018-12-10T12:56:27+5:302018-12-10T13:03:05+5:30
आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमती वाढण्यासह रुपयांतील घसरणीचा परिणाम
विजयकुमार सैतवाल
जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेली घसरण तसेच लग्न सराईमुळे वाढलेली मागणी या सर्व कारणांमुळे सोन्याच्या भावात एकाच आठवड्यात तब्बल १२०० रुपये प्रती तोळ््याने वाढ झाली आहे.
३० नोव्हेंबर रोजी ३० हजार ९०० रुपयांवर असलेले सोने ८ डिसेंबर रोजी ३२ हजार १०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचून सोन्याचे पुन्हा एकदा ३२ हजाराच्या पुढे गेले आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने- चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारल्याने भारतातही सोन्याचे भाव वाढले आहे. या सोबतच गेल्या आठवड्यात ७०.७२ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे दर या आज ७१. ७२ रुपयांवर पोहचल्याने सोन्याच्या भाववाढीस मदत होत आहे.
लग्नसराईमुळे वाढली मागणी
दसरा, दिवाळी काळात सोन्याची मोठी मागणी वाढल्याने दिवाळीमध्येदेखील सोने ३२ हजाराच्या पुढे गेले होते. मात्र त्यांनतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव कमी झाल्याने व डॉलरच्या तुलेत भारतीय रुपयात सुधारणा झाल्याने सोन्याचे भाव गडगडले होते. तरीदेखील त्या काळात सोन्याला मागणी नव्हती. मात्र लग्नसराई सुरू होताच सोन्याला मागणी वाढली असून सुवर्णनगरी जळगावातील सुवर्णपेढ्या ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत.
दररोज १०० ते ३०० रुपयांनी वाढ
गेल्या आठवड्यापासून सोन्यामध्ये दररोज १०० ते ३०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होत आहे. ३० नोव्हेंबर रोजी ३० हजार ९०० रुपये प्रती तोळा असलेल्या सोन्याच्या भावात एकाच दिवसात २०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते ३१ हजार १०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर अशीच वाढ सुरू राहून ४ डिसेंबर रोजी सोने ३१ हजार ३०० रुपये प्रती तोळा झाले. पुन्हा ५ रोजी सोने ३१ हजार ४०० रुपये, ६ रोजी ३१ हजार ७०० रुपये, ७ रोजी ३१ हजार ९०० रुपयांवर सोने पोहचले आणि ८ डिसेंबर रोजी २०० रुपयांनी वाढ होऊन सोने ३२ हजार १०० रुपये प्रती तोळा झाले.
चांदीतही ५०० रुपयांनी वाढ
चांदीच्या भावातही एकाच दिवसात ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ३९ हजार रुपये प्रती किलोवरून ३९ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे. ५ डिसेंबर रोजी चांदी ३९ हजार रुपयांवर होती. ती ६रोजी ३९ हजार ५०० रुपये प्रती तोळा झाली. तेव्हापासून ती ३९हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण झाल्याने सोन्याचे भाव वाढत आहे. या सोबतच लग्नसराईमुळे सोने-चांदीला मागणी वाढल्यानेही भाव वाढत आहे.
- गौतमचंद लुणिया, जिल्हाध्यक्ष, सराफ बाजार असोसिएशन.