आठ दिवसात सोन्याच्या भावात ८०० रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:52 PM2019-05-15T23:52:29+5:302019-05-15T23:52:58+5:30
पुन्हा ३३ हजाराच्या उंबरठ्यावर
जळगाव : भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारत असतानाच लग्न सराईमुळे मागणी वाढत असल्याने आठवडाभरापासून सोन्याच्या भावात तेजी येत आहे. अक्षयतृतीयेनंतर सुरु झालेल्या भाववाढीमुळे आठवडाभरात सोने ८०० रुपये प्रती तोळ््याने वाढून ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचले आहे. मार्च महिन्यानंतर दोन महिन्यांनी सोने पुन्हा एकदा ३३ हजाराच्या उंबरठ्यावर आहे. दुसरीकडे चांदी मात्र आठवड्यापासून ३९ हजार रुपये प्रती किलोवर स्थिर आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने-चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने भारतातही सोन्याचे भाव वाढत आहे. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आठवडाभरात भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारला आहे. गेल्या आठवड्यात ६९.६२ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे भाव ७०.३५ रुपयांवर पोहचले आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव आठवडाभरापासून दररोज वाढत आहे.
लग्न सराईमुळे वाढली मागणी
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीच्या दिवशी सोने १०० रुपयांनी कमी होऊन ३२ हजार १०० रुपयांवर आले होते. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दररोज भाववाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात ३४ हजारावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात घसरण होऊन ते ३२ हजार १०० रुपयांवर येऊन भाव कमी झाल्याचा ग्राहक फायदा घेत असताना ही मागणी वाढत गेली. लग्नसराईमुळे या मागणीत मोठी भर पडत असून सुवर्णनगरी जळगावातील सुवर्णपेढ्या गर्दीने गजबजून गेल्या आहेत. या वाढत्या मागणीमुळे आठवडाभरात सोन्याचे भाव दररोज १०० रुपयांनी वाढत गेले. ७ मे रोजी ३२ हजार १०० रुपये प्रती तोळा असलेले ८ रोजी ३२ हजार २०० रुपये प्रती तोळा, ९ रोज ३२ हजार ३०० रुपये प्रती तोळा अशी वाढ होऊन १४ रोजी ते ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचले. १५ रोजी यात १०० रुपयांनी घसरण होऊन ते ३२ हजार ८०० रुपयांवर आले.
दोन महिन्यानंतर पुन्हा तेजी
अमेरिकन डॉलर उच्चांकीवर पोहचून ७२ रुपये प्रती डॉलर भाव झाल्याने २६ फेब्रुवारी रोजी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. त्यानंतर डॉलरचेही भाव कमी होत गेल्याने सोन्याचे भाव घसरत जावून मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ते ३३ हजारावर आले. त्यानंतर पुन्हा भाव कमी होत गेले व ९ मार्च रोजी हे भाव ३३ हजाराच्या खाली येऊन ते ३२ हजार ८०० रुपयांवर आले. तेव्हापासून दररोज भाव कमी होत जाऊन २५ मार्च रोजी ३२ हजार ७०० रुपयांवर आले. ही घसरण अशीच सुरू राहून २९ मार्च रोजी सोने ३२ हजारावर आले. त्यानंतर सोन्यातील ही घरसण आता थांबली असून दोन महिन्यांनंतर पुन्हा तेजी सुरू होऊन सोने पुन्हा एकदा ३३ हजाराकडे झेप घेत आहे.
मागणी नसल्याने चांदी स्थिर
एकीकडे सोन्याला प्रचंड मागणी वाढल्याने त्याचे भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र चांदीला मागणी नसल्याने ती ३० हजार रुपये प्रती किलोवर स्थिर आहेत. महत्त्वाचे म्हणजे चांदीची औद्योगिक मागणी घटल्याने त्याचा मोठा परिणाम होत असल्याने विक्रेत्यांनी सांगितले. या महिन्यात ५ मे रोजी चांदीच्या भावात ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ३९ हजारावर पोहचली तेव्हापासून ती त्याच भावावर स्थिर आहे.
अडीच महिन्यात चांदीत ३ हजाराची घसरण
अडीच महिन्यात चांदीचे भाव थेट तीन हजार रुपये प्रती किलोने कमी झाले आहे. २६ फेब्रुवारी रोजी ४१ हजार ५०० रुपये प्रती किलो असलेल्या चांदीच्या भावात घसरण होऊन ती ९ मार्च रोजी ४१ हजार रुपये प्रती किलोवर आली. त्यानंतर पाच दिवसात थेट एक हजार रुपये प्रती किलोने चांदीचे भाव कमी होऊन १४ मार्च रोजी चांदीचे भाव ४० हजार रुपये प्रती किलो झाले. ही घसरण कायम राहत २४ मार्च रोजी ३९ हजार ५०० रुपये प्रती किलो व २९ मार्च रोजी ३९ हजारावर चांदी आली. त्यानंतर पुन्हा घसरण होऊन ती ३८ हजार ५०० रुपये प्रती किलो अशा निच्चांकीवर आली. मात्र ५ मे रोजी त्यात वाढ होऊन ती ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली व तेव्हापासून हे भाव कायम आहे.
भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारण्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने तसेच लग्नसराईमुळे मागणी वाढत असल्याने सोन्याचे भाव वाढत आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, शहर सराफ असोसिएशन, जळगाव.