‘अक्षय्य’ मुहूर्तावर सोने ९०० रुपयांनी वाढले, ३० ते ३५ कोटींची उलाढाल; चांदी दीड हजाराने वधारली
By विजय.सैतवाल | Published: May 10, 2024 04:26 PM2024-05-10T16:26:10+5:302024-05-10T16:26:54+5:30
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी होऊन त्यात किरकोळ चढ-उतार सुरू होता; मात्र ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ झाली.
जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सुवर्णनगरी जळगावात सोन्याला दुपटीपेक्षा अधिक मागणी राहून या मुहूर्तावर ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शुक्रवारी, १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. तसेच चांदीच्याही भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. ऐन मुहूर्तावर भाव वाढले तरी ग्राहकांनीही खरेदीचा ‘अक्षय्य’ आनंद घेतल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी होऊन त्यात किरकोळ चढ-उतार सुरू होता; मात्र ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे २२ एप्रिलनंतर सोन्याचे भाव पुन्हा एकदा ७३ हजारांच्या पुढे जात ते ७३ हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले; तसेच चांदीच्याही भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती २१ एप्रिलनंतर पुन्हा ८४ हजार रुपयांच्या पुढे गेली व ती ८४ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.
एकीकडे भाव वाढले असले तरी अक्षय मुहूर्तामुळे सोने-चांदीच्या विक्रीत वाढ झाल्याचे शहरातील प्रमुख ज्वेलर्सच्या वतीने सांगण्यात आले. या प्रमुख सराफा दुकानांसह एकूण १७५ फर्ममध्ये एकूण किती उलाढाल झाली याचा नेमका आकडा सांगणे कठीण असले तरी ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दुपारी वाढली गर्दी
सोने खरेदीसाठी दुपारी १२ नंतर गर्दी वाढत गेली. मुहूर्तावर नवीन दागिने खरेदी तर झालीच सोबतच या मुहूर्तावर खरेदी केलेले सोने अक्षय राहते, अशी श्रद्धा असल्याने दागिने घ्यायचे नसले तरी किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी केले पाहिजे, याकडेही मोठा कल होता. त्यामुळे सुवर्ण बाजारात मोठी उलाढाल दिसून आली.
ग्राहकांचा खरेदीसाठी उत्साह
दररोजपेक्षा आज सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्त्व असल्याने ग्राहकांनी थोडे तरी सोने खरेदी केले. - आकाश भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक.