अर्थसंकल्प सादर होताच सोने ३५० रुपयांनी वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 01:23 PM2019-07-06T13:23:35+5:302019-07-06T13:24:00+5:30
सीमा शुल्क अडीच टक्क्याने वाढविले
जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्कात अडीच टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर होताच शुक्रवारीदुपारी सोने ३५० रुपये प्रती तोळ््याने वाढले. सकाळी ३४ हजार ४०० रुपयांवर असलेले सोने दुपारी ३४ हजार ७५० रुपयांवर पोहचले.
सोन्याच्या आयातीवर सध्या १० टक्के सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) आकारले जाते. त्यात सरकारने आता अर्थसंकल्पात अडीच टक्क्याने वाढ करून सोन्यावर साडे बारा टक्के सीमा शुल्क लावले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण बाजारात दलाल सक्रीय झाल्याने अगोदरच सोने ३४ हजाराच्या पुढे पोहचलेले आहे. त्यात आता या वाढीव कराने अधिक भर घातली आहे.
एकाच दिवसात दोन भाव
५ जुलै रोजी सकाळी सुवर्ण बाजार सुरू झाला त्या वेळी सोने ३४ हजार ४०० रुपयांवर होते. सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली व काही वेळात सोन्यावर अडीच टक्क्याने सीमा शुल्क वाढविल्याचे जाहीर होताच सुवर्ण बाजार हादरला. या वाढीव करामुळे भाववाढ लगेच लागू होऊन सोने दुपारी ३४ हजार ४०० रुपये प्रती तोळ््यावरून ३४ हजार ७५० रुपयांवर पोहचले.
कमी करण्याची मागणी असताना वाढविला कर
एक टक्के अबकारी कर कमी करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सुवर्ण व्यावसायिकांनी आंदोलन केले होते. आता तर थेट अडीच टक्क्याने सीमा शुल्क वाढविणे हा सुवर्ण व्यवसायासाठी धक्काच असल्याचे सांगितले जात आहे. सध्या असलेल्या १० टक्के सीमा शुल्कात तीन टक्क्याने कपात करून तो सात टक्के करण्याची सुवर्ण व्यावसायिकांची मागणी होती. मात्र सरकराने कर कमी न करता त्यात थेट अडीच टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचाही सूर उमटत आहे.
चांदी स्थिर
अर्थसंकल्पानंतर सोने वधारले असले तरी चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. सकाळी ३९ हजार ५०० रुपयांवर असलेली चांदी अर्थसंकल्पानंतरही संध्याकाळपर्यंत याच भावावर स्थिर होती.
-----
सोन्यावरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरून कमी करून ते ७ टक्के करणे अपेक्षित होते. मात्र सरकारने उलट त्यात वाढ केली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव आता प्रती तोळा ३५० ते ४०० रुपयांनी वाढले आहे.
- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.