सोने ३७ हजार २०० तर चांदी ४२ हजार ५०० रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:55 PM2019-08-08T12:55:59+5:302019-08-08T12:56:21+5:30
सोन्यात तेजी सुरूच, चांदीही एक हजाराने वधारली
जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असल्याने सोन्यामध्येही तेजी सुरूच आहे. सोन्याच्या भावात पुन्हा ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते ३७ हजार २०० रुपये प्रती तोळा झाले आहे. सोन्यासोबत चांदीही एकाच दिवसात एक हजार रुपये प्रती किलोने वधारून ती ४२ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण तसेच रशिया आणि चीनने सोन्याची वाढविलेली खरेदी यामुळे सोन्याचे भाव दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ६ रोजी ३६ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात बुधवारी ७०० रुपयांनी वाढ झाली. सोने आज ३७ हजार २०० रुपयांवर पोहचले आहे.
६ रोजी केवळ सोन्याच्या भावात वाढ झाली होती. मात्र ७ आॅगस्ट रोजी चांदीच्या भावात एक हजार रुपये प्रती किलोने वाढ झाली आहे. या पूर्वी २३ जुलै रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ होऊन चांदी ४० हजार रुपये प्रती किलोवरून ४१ हजार ५०० रुपयांवर पोहचली होती. त्यानंर दोन आठवड्यात पुन्हा एक हजार रुपयांनी चांदी वधारली आहे.
सोने गाठणार ४० हजाराचा टप्पा
मुंबई शेअर बाजारातील घसरण पाहता सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे. तसेच रुपयातील घसरणीमुळे सोने असेच वाढत राहणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे. यामध्ये पुढील आठवडाभरातील डॉलरच्या तुलनेतील भारतीय रुपयाच्या दरांचा अंदाज पाहता रुपयात घसरण सुरूच राहणार असल्याचे सांगितले जात असल्याने सोने ४० हजारावर पोहचण्याची शक्यता असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची वाढलेली खरेदी व दुसरीकडे भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याच्या भावात वाढ होत आहे. सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.