दीड वर्षानंतर सोने खरेदीस ‘झळाळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:09 PM2017-09-28T13:09:17+5:302017-09-28T14:14:05+5:30
सुवर्णनगरी अशी देशभर ख्याती असलेल्या जळगावात नवरात्रोत्सवाच्या काळात सोने खरेदीचा मोठा उत्साह दिसून येत असून दररोज गर्दीमध्ये भर पडत आहे.
जळगाव - सुवर्णनगरी अशी देशभर ख्याती असलेल्या जळगावात नवरात्रोत्सवाच्या काळात सोने खरेदीचा मोठा उत्साह दिसून येत असून दररोज गर्दीमध्ये भर पडत आहे. तब्बल दीड वर्षानंतर सोने खरेदीचा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात उत्साह दिसून येत असल्याने व्यावसायिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. उलाढाल वाढली तर आहेच सोबतच दस:यासाठी मनाजोगे दागिने मिळावे म्हणून त्यांचे बुकिंगदेखील केले जात आहे.
अबकारी कर, सुवर्ण व्यावसायिकांचा संप, नोटाबंदी, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम, जीएसटी अशा वेगवेगळ्य़ा कारणांनी या व्यवसायावर मंदीचे सावट होते. संपामुळे विस्कटलेली घडी पुन्हा बसवित असताना नोटाबंदीच्या फे:यात हा व्यवसायात अडकला व तब्बल सहा महिने त्यातून बाहेर पडू शकला नाही. त्यानंतर पुन्हा जीएसटीमुळे व्यापा:यांसह ग्राहकांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याने तसेच गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे या व्यवसायात मंदीचे चित्र होते.
मात्र आता नवरात्रोत्सवास सुरुवात होताच सर्व मरगळ दूर झाल्याचे चित्र असून सुवर्ण बाजारात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे दीड वर्षानंतर प्रथमच बाजारात पहिल्यासारखे उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच सोने खरेदीला येथे सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू यात भर पडून गेल्या महिन्याच्या तुलनेत ही उलाढाल दीडपटीने वाढली आहे.
सणासुदीसाठी दागिणे खरेदीसाठी ग्राहकांचा कल दिसून येत आह़े नवरात्रात तर मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जातच आहे, सोबतच दस:याला मनासारखे अलंकार मिळावे म्हणून मोठय़ा प्रमाणात बुकिंगदेखील केले जात आहे. यासाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद असल्याचे विक्रेत्यांनीही सांगितले. सुरक्षित गुंतवणूक असल्याने ग्राहकांचा यावरील विश्वासअजूनही कायम असल्याचे चित्र आहे.
पारंपारिक दागिन्यांसह फॅन्सी दागिने, टेम्पल ज्वेलरी व त्यातल्या त्यात लहान आकाराच्या दागिन्यांना जास्त मागणी आहे तर हौस म्हणून मोठेही दागिनेही खरेदी केले जात आहे.
सुवर्णनगरीतील दागिने देशभरात
जळगाव जिल्ह्यातील ग्राहक तर येतच आहे सोबत मराठवाडा, विदर्भ या लागून असलेल्या भागातील ग्राहक येथे येत असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे येथील दागिने देशभरातही पोहोचत असून जळगावात नातेवाईकांकडे आलेली राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात व इतर भागातील मंडळी येथून सोने खरेदी करून नेत असते. अशा ग्राहकांचीही मागणी वाढणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. सोन्यासह चांदीच्या दागिन्यांमध्ये हातातील कडे, गोट, पाटली, बांगडी, गोखरु, हाताचे वाळे या अलंकारांनाही मागणी आहे.
नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून सोने खरेदीसाठी चांगली ग्राहकी सुरू झाली आहे. सोबतच दस:यासाठी बुकिंगदेखील केले जात आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.
- मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर.सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव.