सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:51 AM2021-02-05T05:51:00+5:302021-02-05T05:51:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे भाव कमी झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे भाव कमी झाले आहेत. चांदीत एक हजाराने घसरण होऊन ती ७३ हजार रुपयांवर आली. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ४९ हजार ५०० रुपयांवर आले. शेअर बाजारात उसळी आली असताना सुवर्णबाजारात मात्र घसरण होत आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात सुवर्ण बाजारासंदर्भात काही घोषणा न झाल्यास त्यांचे भाव वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्कात पाच टक्क्याने कपात करण्यात आली. त्यामुळे त्यांचे भाव अर्थसंकल्प सादर होताच कमी झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही ही घसरण कायम राहत चांदीच्या भावात १ हजार रुपयांनी घसरण झाली व चांदी ७४ हजारावरून ७३ हजार रुपये प्रति किलोवर आली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ४९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
शेअर बाजारात उसळी
केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्याने याचा सर्वच क्षेत्राला लाभ होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात उद्योग क्षेत्रालाही लाभ होणार असल्याचे सांगितले जात असल्याने गुंतवणूकदारांचा कल तिकडे वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यानुसार शेअर बाजारात उसळी येऊन बाजाराने ५० हजारांचा टप्पा ओलांडला. शेअर बाजारात उसळी आल्यास सुवर्ण बाजारात घसरण होते हा नेहमीचा अनुभव आहे. त्यानुसार या वेळीदेखील सेन्सेक्स वाढू लागला व सोने-चांदीत घसरण होत आहे.