सोने-चांदीच्या दराचा विक्रम; चांदी ६०,५०० रुपयांवर; सोनेही बनले ५१ हजारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 10:44 PM2020-07-22T22:44:51+5:302020-07-22T22:44:56+5:30
चांदीमध्ये एकाच दिवसात ६,५०० रुपयांनी वाढ; जागतिक बाजारात जाणवतो तुटवडा
जळगाव : जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात चांदीची खरेदी वाढल्याने व आवकही कमी असल्याने चांदीच्या भावात एकाच दिवसात ६,५०० रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे चांदीचे दर थेट ६०,५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. अशाच प्रकारे सोन्याच्या दरामध्येही एक हजार रुपयांनी वाढ होऊन ते ५१ हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहेत. या दोन्ही दरांनी नवीन उच्चांक नोंदविले.
कोरोनाच्या संकटात अनेक उद्योग, व्यवसाय डबघाईस येत असताना त्यांच्यातील गुंतवणूकही घटत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याने या मौल्यवान धातूंची मागणी वाढतच आहे. त्यात अमेरिकन बँकांसह परदेशातील विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्यानेदेखील सोने-चांदीत गुंतवणूक वाढून जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे.
गेल्या एक-दोन दिवसात जागतिक पातळीवर चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे झपाट्याने भाववाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सोने-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने नवनवे विक्रम गाठले जात आहेत. यात आता तर एकाच दिवसात थेट ६,५०० रुपयांची वाढ ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे.
गेल्या आठवड्यात चांदी ५४ हजार रुपये प्रतिकिलोवर होती. मात्र आता अचानक बुधवारी (दि. २२) त्यामध्ये ६,५०० रुपयांची वाढ होऊन ती ६० हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. दोन आठवड्यांमध्ये चांदीमध्ये तब्बल १० हजार रुपयांची वाढ झाली आहे.
सुवर्णनगरी जळगावात ७ ते १३ जुलैदरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात आले. त्या वेळी लॉकडाऊनपूर्वी चांदी ५०,५०० रुपयांवर होती. त्यानंतर १४ रोजी सुवर्णपेढ्या सुरू होताच चादीच्या भावात ३,५०० रुपयांनी वाढ होऊन ती ५४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती.
सोनेही एक हजाराने वधारले
चांदीसोबतच सोन्याच्याही भावात वाढ झाली असून, सोने एक हजार रुपयांनी वधारून ते ५१ हजार रुपये प्रतितोळा झाले आहे. सोन्यातदेखील दोन आठवड्यांमध्ये १,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. ७ जुलैच्या लॉकडाऊनपूर्वी सोने ४९,२०० रुपयांवर होते. त्यानंतर १४ रोजी सुवर्णपेढ्या सुरू होताच सोन्याचे भाव ८०० रुपयांनी वाढून ते ५० हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. आता पुन्हा त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.
जागतिक घडामोडींचा परिणाम होऊन सोने-चांदीत भाववाढ होत आहे. त्यातच जागतिक पातळीवर मोठी खरेदी होऊन बाजारात तुटवडा भासत असल्याने चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. सध्याची स्थिती पाहता भविष्यात भाववाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन