जगदंबेच्या पावलांनी 'सुवर्ण' झळाळी, भाव कमी झाल्याने सोने-चांदी खरेदीची संधी
By विजय.सैतवाल | Published: September 26, 2022 04:19 PM2022-09-26T16:19:33+5:302022-09-26T16:19:45+5:30
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन ५० हजार ३०० रुपये प्रति तोळा तर चांदीचे भाव ८०० रुपयांनी कमी होऊन ५६ हजार रुपये प्रति किलोवर आले.
जळगाव : पितृपक्ष संपताच सुवर्ण व्यवसायातील मंदीचा काळ संपून, या व्यवसायात नवरात्रोत्सवापासून ‘सुवर्ण’ झळाळी येणार असल्याचे सुखद संकेत दिले जात आहे. यातच, नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी मुहूर्त साधला आहे. यातच, सोने-चांदीचे दरही कमी झाल्याने ग्राहकांकडून खरेदीची संधी साधली जाणार आहे. विशेष म्हणजे, सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ असल्याचेही सांगितले जात आहे. एकूणच आदिशक्तीच्या आगमनाने बाजारपेठेत चैतन्य पसरले असल्याचे सुखद चित्र आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन ५० हजार ३०० रुपये प्रति तोळा तर चांदीचे भाव ८०० रुपयांनी कमी होऊन ५६ हजार रुपये प्रति किलोवर आले. सोने-चांदी हे सुरुवातीपासूनच सर्वांचे आकर्षण आहे. यामुळे महिला वर्गाचा विविध प्रकारचे दागिने खरेदी करण्याकडे कल असतो. यातच विविध मुहूर्त साधून खरेदीला महत्त्व दिले जाते.
मध्यंतरी दोन वर्षे निर्बंधामध्ये गेल्याने काहीशी बंधने होती. मात्र निर्बंध पूर्णपणे हटविल्याने बाजारपेठेत उत्साह आहे. त्यात आता सुवर्ण व्यवसायातील पितृपक्षाचा मंदीचा काळ संपला असून नवरात्रोत्सवापासून खरेदीला वेग येऊ लागला आहे. शिवाय गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत सोने-चांदीचे भाव कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. नवरात्र व आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण व्यवसायिकांनीदेखील सोने चांदीचे आकर्षक आभूषणे उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचे पाय आपसूकच सुवर्ण पिढीकडे वळतील, असा विश्वास सुवर्ण व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.
भाव कमी झाल्याचा फायदा -
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव ५२ हजार रुपयांच्या पुढे प्रति तोळा तर चांदी ५९ हजार रुपये प्रति किलोच्या पुढे होते. मात्र हळूहळू हे भाव कमी होत गेले व आता सोने ५० हजार ३०० रुपये प्रति तोळा असून चांदी ५६ हजार रुपयांवर आहे. शिवाय गेल्या वर्षाच्या तुलनेत चांदीचेही भाव पाच हजार रुपयांनी कमी आहे. भाव कमी असल्याने ग्राहक याचा फायदा घेऊ शकतात.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून कल
कोरोनामुळे वेगवेगळ्या व्यवहारावर परिणाम होऊन अनेकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदी खरेदीला पसंती दिली. त्यानुसार आताही भाव कमी झाल्यामुळे ही खरेदी आणखीनच वाढणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू होऊन भाववाढ होण्याची शक्यता तर आहेच, शिवाय त्या पूर्वी विजयादशमी, धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा या काळातहीदेखील सध्याच्या तुलनेत भाववाढ होऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने आत्ताच खरेदीची योग्य वेळ असून नवरात्रोत्सवात सुवर्ण बाजार चांगलाच गजबजणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सुवर्ण अलंकारांसह चांदीच्या वस्तूंना वाढते मागणी -
पितृपक्ष पक्ष संपताच आता घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असून सुवर्ण अलंकारांसह चांदीचे पूजा साहित्य, लहान मूर्ती, मुकूट, छत्र, सिंहासन यांना मागणी राहणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रोत्सवापासून सुवर्ण व्यवसायात खरेदीची लगबग असते. त्यात सध्या सोने-चांदीचे भाव कमी असून या काळात खरेदी केल्यास फायदेशीर ठरणार आहे.
- भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक.