सोने-चांदीच्या भावात पुन्हा घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:17+5:302021-06-16T04:24:17+5:30
जळगाव : गेल्या आठवड्यापर्यंत भाववाढ होत राहिलेल्या सोने - चांदीच्या भावात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोमवारी आठवड्याची सुरुवात ...
जळगाव : गेल्या आठवड्यापर्यंत भाववाढ होत राहिलेल्या सोने - चांदीच्या भावात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोमवारी आठवड्याची सुरुवात घसरणीने होऊन सोन्यात ३००, तर चांदीच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे एप्रिल महिन्यापासून सुवर्ण बाजार बंद राहिला. मात्र, या काळात कमोडिटी मार्केटमध्ये खरेदी - विक्रीचे व्यवहार होऊन सोने - चांदीचे भाव वधारत गेले. इतकेच नव्हे १ जूनपासून निर्बंध शिथिल झाल्यानंतरदेखील हे भाव वाढतच राहिले. मात्र, गेल्या आठवड्यात अनलॉक झाले. त्यानंतर सोने - चांदीचे भाव कमी होऊ लागले. ९ जून रोजी सोने ५० हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. मात्र, १० जून रोजी त्यात ३०० रुपयांची घसरण झाली व ते ४९ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर आले. त्यानंतर आता पुन्हा त्यात ३०० रुपयांची घसरण होऊन ते ४९ हजार ४०० रुपये प्रतितोळ्यावर आले. अशाच प्रकारे ९ जून रोजी ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर असलेल्या चांदीच्या भावात १० जून रोजी ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७३ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली. आता पुन्हा त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन चांदी ७३ हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे.