सोने- चांदी दरात दुसऱ्या दिवशीही वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:12 PM2020-01-07T12:12:22+5:302020-01-07T12:13:13+5:30
जळगाव : अमेरिका व इराणमधील तणाव वाढत असल्याने त्याचा परिणाम सोने व चांदीच्या भाव वाढीवर होत आहे. सोने- चांदीच्या ...
जळगाव : अमेरिका व इराणमधील तणाव वाढत असल्याने त्याचा परिणाम सोने व चांदीच्या भाव वाढीवर होत आहे. सोने- चांदीच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ झाली. एकाच दिवसात सोने आठशे रुपयांनी तर चांदी एक हजार रुपयांनी वधारले आहे. सोने $४०,६०० रुपयांवरून ४१, ४०० तर चांदी ४८ हजार रुपयांवरून ४९ हजारावर पोहचले आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य, वायदे बाजार या सर्वांचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होत असतो. यात अमेरिका, युरोपियन देशांच्या सराफ बाजारावर भारतीय बाजारातील सोन्याचे भाव अवलंबून असतात. त्यात आता अमेरिका व इराण यांच्या तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीच्या भावावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी सोने ३९ हजार ५०० रुपयांवर राहिले. २ रोजी त्यात १०० रुपयांनी वाढ होऊन ते ३९ हजार ६०० रुपये प्रती तोळा झाले होते. यानंतर अमेरिका व इराण यांच्यातील तणाव पाहता सोने-चांदीचा बाजार तापू लागला आहे.
अमेरिका- इराण यांच्यात तणाव वाढल्याने त्याचा परिणाम सोने- चांदीच्या दरात झाला आहे. मात्र खरेदी वाढलेली नाही. दोन्ही देशातील तणाव निवळल्यास दर खाली येऊ शकतात.
-पंकज लुंकड, सराफा व्यावसायिक, जळगाव.