मुलासाठी कपडे खरेदीला आलेल्या महिलेची सोन्याची पोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:06+5:302021-01-10T04:13:06+5:30
जळगाव : मुलासाठी कपडे खरेदीला आलेल्या सरला सुनील बारी (३५,रा.शिरसोली,ता.जळगाव) या महिलेच्या गळ्यातील सोने मंगळसूत्र व मणी असलेली पोत ...
जळगाव : मुलासाठी कपडे खरेदीला आलेल्या सरला सुनील बारी (३५,रा.शिरसोली,ता.जळगाव) या महिलेच्या गळ्यातील सोने मंगळसूत्र व मणी असलेली पोत लांबविण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता दाणाबाजारात घडली. तीन ग्रॅमचे मंगळसूत्र व दीड ग्रॅमचे मणी या पोतमध्ये होते. सरला बारी या मुलगा पंकज याला घेऊन शनिवारी रिक्षाने खरेदीसाठी आलेल्या होत्या. बी.जे.मार्केट येथून पायीच चालत आल्यानंतर सुभाष चौकात आल्या. तेथे अननस घेतले व नंतर भांड्याच्या दुकानात गेल्या. तेथून दाणाबाजारातून फुले मार्केटमध्ये कपडे खरेदीला जात असताना गळ्यातील पोत तुटलेली दिसली. त्यातील मंगळसूत्र व मणी गायब होते तर काळे मणी असलेली अर्धवट पोत साडीत अडकलेली होती. २० हजार रुपयाच्यावर दागिन्यांची किंमत असून हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सुभाष चौकातील पोलिसांकडे धाव घेतली. तेथून त्यांना शहर पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, मुलगा पंकज याने भांड्याच्या दुकानाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र काही उपयोग झाला नाही. शहर पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली.