गोटे-कदमबांडेंच्या कथित युतीची गुगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 04:32 PM2018-11-04T16:32:09+5:302018-11-04T16:32:19+5:30

धुळे महापालिका निवडणुकीचे पक्षीय राजकारण आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. भाजपाने स्वपक्षीय आमदार अनिल गोटे यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. त्यातून गोटे-कदमबांडे यांच्या कथित युतीची गुगली टाकण्यात आली आहे.

Gole-step | गोटे-कदमबांडेंच्या कथित युतीची गुगली

गोटे-कदमबांडेंच्या कथित युतीची गुगली

Next

मिलिंद कुलकर्णी

विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत परस्परविरोधी झुंजणारे अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे यांच्या कथित युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दोन्ही नेते त्या चर्चांना हवा देत आहे. याचा अर्थ असा निघतो की, भाजपा आता दोघांचा क्रमांक एकचा शत्रू आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने दोघांनी एकत्र यायला काय हरकत आहे, असा विचार यामागे असू शकतो. गिरीश महाजन यांचे वादळ कसे थोपवायचे असा प्रश्न दोघा नेत्यांना भेडसावत आहे. त्यातून विधानसभा व महापालिका अशी एकमेकांमध्ये वाटणी करण्याचा प्रयत्नदेखील होऊ शकतो.

कथित युतीविषयी पहिला प्रस्ताव गोटे यांनी दिला आहे, मात्र त्यातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुनच युती करु असा सावधगिरीचा पवित्रा आहे. कदमबांडे यांनीही पक्षश्रेष्ठींची अनुकूलता असेल तरच युती करु, असे म्हटले आहे. गोटे आणि पवार यांचे संबंध सर्वश्रृत आहे, त्यामुळे त्यांची मान्यता कशी मिळेल, याविषयी उत्सुकता राहील. पक्षाने गिरीश महाजन यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपविल्यानंतर मुख्यमंत्री गोटेंना अशी संमती देतील का हा प्रश्न आहेच. नजिकच्या काळात उलगडा होईल.

धुळे महापालिकेची निवडणूक ९ डिसेंबरला होत आहे. दिवाळीचे फटाके यंदा धुळ्यात अधिक फुटणार आहेत. दिवाळीनंतर ही निवडणूक जाहीर होईल, अशी अपेक्षा असताना अचानक जाहीर झाल्याने राजकीय पक्षांची धांदल उडाली. पण खरी धमाल उडवली आहे ती, परस्परांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे या नेत्यांनी.
विधानसभा आणि महापालिका या दोन्ही निवडणुकांमध्ये गेल्या २० वर्षांपासून हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात लढत आहेत. विशेष म्हणजे, ज्याच्याकडे महापालिका येते, त्याला विधानसभा निवडणुकीत यश येत नाही. गोटे तीनदा तर कदमबांडे दोनदा आमदार झाले. सलग पंधरा वर्षांपासून महापालिका कदमबांडे यांच्या ताब्यात आहे. तत्पूर्वी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे या निवडून आल्या होत्या. त्यामुळे दोन्ही नेत्यांना विधानसभा आणि पालिका या दोन्ही संस्थांचा प्रदीर्घ अनुभव आहे. परस्पर विरोधक असल्याने दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे पंख छाटण्याची, कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. गोटे आक्रमक आहेत, त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणी फारसे जात नाही. मात्र गोटे सगळ्यांना फैलावर घेत असतात. जिल्हा बँकेतील आग, महापालिकेतील आग, कुख्यात गुंड गुड्डयाचा निर्घृण खून या घटनांचे गोटेंनी राजकीय भांडवल केले. कदमबांडे यांनीही गोटे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेली पांझरा चौपाटी अतिक्रमण ठरवून काढली. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून गोटेंनी पांझराच्या दोन्ही तीरांवर रस्ते तयार करायला सुरुवात केली. रस्ता कामात अतिक्रमणे ठरणारी धार्मिक स्थळे काढली. भाजपा, शिवसेनेने त्याला विरोध केला. कारवाई थांबली तरी रस्त्याचे काम वेगात सुरु आहे.
ही सगळी पार्श्वभूमी असताना गोटे-कदमबांडे यांच्या कथित युतीच्या चर्चेने भले भले चक्रावले. काहींचे तर धाबे दणाणले. दोन्ही नेत्यांच्या भांडणाचा लाभ उठविणारे, आगीत तेल ओतणारे कार्यकर्ते दोन्ही बाजूंना आहेत. नेते एकत्र आले तर भंडाफोड होईल, म्हणून त्यांची पाचावर धारण बसली. युती होईल की, नाही हा प्रश्न काळाच्या उदरात दडलेला असला तरी ही परिस्थिती का निर्माण झाली, याचा वेध घ्यावा लागणार आहे.
सहा महिन्यात लोकसभा तर वर्षभरात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत २०१४ चा करिष्मा राहण्याची शक्यता धूसर झाल्याने विकास कामांचा ढोल वाजवावा लागणार आहे. मात्र केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या विकास कामांच्या दाव्याची चिरफाड विरोधी पक्षांपेक्षा स्वकीय आमदार अनिल गोटे अधिक करीत आहे. मग तो मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ योजना असो की, विखरणच्या धर्मा पाटील कुटुंबियांसह बाधितांचा प्रश्न असो, गोटे हे त्यात जातीने लक्ष घालून टीकास्त्र सोडतात. निवडणुका तोंडावर असताना हे परवडणारे नाही, हे दोन्ही मंत्र्यांसह भाजपा श्रेष्ठींना पुरते माहित आहे. गोटे हे स्वयंभू नेते असल्याने त्यांची समजूत घालणे, मनधरणी करणे अशक्य आहे. दोनदा ते अपक्ष निवडून आल्याने त्यांना कोणत्या राजकीय पक्षाच्या कुबडीची फारशी गरज राहिलेली नाही. त्यामुळे दोन्ही मंत्री असूनही गिरीश महाजन या जळगावच्या संकटमोचक मंत्र्यांना धुळ्याला धाडण्यात आले. महाजन यांची रणनीती निश्चित आहे, पण ते अद्याप गोटेंविषयी सावध पवित्रा घेत आहेत. गोटे यांनी स्वतंत्र निवडणूक कार्यालय थाटले, इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्या, रोज प्रचार सभांचा धडाका सुरु आहे, पत्रकबाजीतून प्रशासन आणि भाजपाचे वस्त्रहरण केले जात आहे, तरीही पक्षश्रेष्ठी शांत आहेत. मनोज मोरे, शीतल नवले, देवा सोनार यांचा पक्षप्रवेश धुळ्यात नव्हे तर मुंबईत झाला. भाजपाने अद्याप इच्छुकांचे अर्ज आणि मुलाखती या प्रक्रियेला सुरुवात केली नसली तरी त्यांचे सर्व ७४ प्रभागातील उमेदवार निश्चित आहे. काहींनी पक्षप्रवेश केला आहे तर काही अद्याप कुंपणावर आहेत.
साम, दाम, दंड, भेद ही रणनीती जळगावात चमत्कार घडवून गेली, त्याच वळणावर आता धुळ्यातील निवडणूक जाणार असल्याचे संकेत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन गोटे आणि कदमबांडे यांच्याकडून कथित युतीच्या चर्चेला हवा देण्यात आली आहे. भाजपाचे वादळ थोपविण्यासाठी उघड अथवा छुपी युतीसुध्दा होऊ शकते, असा अंदाज या चर्चेच्या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भाजपाची तयारी पूर्ण असल्याने ते पलटवार कसा करतात, हाच खरा उत्सुकतेचा विषय आहे.
पुन्हा लोकसंग्राम?
महाजन, भामरे, रावल या त्रिकुटाने गोटे यांच्या कारवायांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. गोटेंनी विरोध करुनही मनोज मोरे, शीतल नवले, सोनार यांना भाजपामध्ये प्रवेश दिला आहे. ‘परके’ म्हणून महाजनांवर तोफ डागणाºया गोटे यांच्या टीकेला प्रत्युत्तरदेखील दिले जात नाही. भाजपाकडून अशीच हेटाळणी राहिली तर गोटे ‘लोकसंग्राम’ या तेजस गोटे यांच्या संघटनेच्या माध्यमातून रिंगणात उतरु शकतात, असा कयास आहे.

Web Title: Gole-step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.