दारूबंदीच्या मागणीसाठी गोंडखेळच्या महिला धडकल्या जामनेर पोलीस ठाण्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 03:20 PM2020-02-26T15:20:47+5:302020-02-26T15:21:28+5:30
गोंडखेळ, ता.जामनेर येथील महिला बुधवारी गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी जामनेर पोलीस ठाण्यावर धडकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर, जि.जळगाव : गोंडखेळ, ता.जामनेर येथील महिला बुधवारी गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी जामनेर पोलीस ठाण्यावर धडकल्या. महिलांसह ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन दिले.
ग्रामपंचायतीने गावात दारूबंदीचा ठराव २५ फेब्रुवारीला केला आहे. दारूमुळे गावात भांडणतंटे होतात व कौटुंबिक वाद वाढत असल्याने दारू विक्री बंद करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली.
गोंडखेळ येथील ज्ञानेश्वर, दुंडे गणेश बनकर, विशाल कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी गावातील अवैध दारूबंदी करण्याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन दिले होते. सरपंच चित्रा परदेशी व ग्रामसेवक एम.एस.वराडे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन पाठविले. जामनेरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना आज निवेदन देण्यात आले.
यावेळी भारती बाविस्कर, सुशीला इंगळे, जनाबाई बँकर, सविता मिरगे, प्रमिला रोकडे, सुनील मगर, सोनू साखरे, गजानन चोपडे, प्रदीप कोळी, नीलेश राजपूत, गोपाळ चोपडे, अनिल कोळी, संजय कोळी आदी दीडशे ग्रामस्थांच्या निवेदनावर साह्य आहेत. पोलीस पाटील यांच्याबद्दल ग्रामस्थांनी निरीक्षक इंगळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, दुपारी पोलिसांनी गोंडखेळ गावात जाऊन अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली.