रोजी गेली, आता रोटीसाठी धान्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:09+5:302021-04-18T04:15:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांची घोषणा करताना ज्यांची रोजी गेली त्यांच्या रोटीचीही सोय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांची घोषणा करताना ज्यांची रोजी गेली त्यांच्या रोटीचीही सोय करू, असे स्पष्ट केले होते. त्यात राज्य सरकारने गरीब घटकांना धान्य देण्याची घोषणा केली होती. मात्र अजूनही राज्य शासनाने या धान्याच्या वाटपाचे आदेशच दिलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन स्तरावर त्याचे नियोजनदेखील करण्यात आलेले नाही.
अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोफत अन्नधान्य योजना लागू केली आहे. त्यात राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ३ किलो गहू, दोन किलो तांदूळ या प्रमाणे एक महिना अन्नधान्य मोफत दिले जाणार आहे. असे असले तरी राज्य सरकारने अद्याप जिल्हा प्रशासनाला तसे आदेशच दिले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मोफत अन्नधान्य देण्याचे नियोजनच केलेले नाही. राज्य शासनाचे आदेश आल्याशिवाय जिल्हा प्रशासनाला नियतन मंजूर करता येणार नसल्याचे पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात सध्या अंत्योदय योजनेत १ लाख ३७ हजार ७४९ रेशन कार्ड आहेत. त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
निवृत्ती वेतन योजना लाभार्थींना आर्थिक साहाय्य देण्याची घोषणादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा पाच योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दिले जाणार आहे. मात्र त्यासाठी राज्य शासनाने अद्यापही अनुदान पाठवलेले नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर त्याचे नियोजन होऊ शकलेले नसल्याचे समोर आले आहेत. या पाचही योजनांचे मिळून जळगाव जिल्ह्यात २ लाख ४० हजार ४७२ लाभार्थी आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजनेत ५८ हजार २८४, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत ७८९०१, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ८९ हजार ४१५, विधवा निवृत्ती वेतन योजना १३,३१४ आणि राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेत ५५८ लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये मिळणार आहेत.
लाभार्थ्यांना वाट बघावी लागण्याची शक्यता
राज्य शासनाने सध्या फक्त शिवभोजन केंद्रांवर मोफत थाळ्या देण्याची आणि त्यात ५० टक्के वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शनिवारी दुपारपर्यंत धान्य वाटपाचे कोणतेही आदेश दिले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील या योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळण्यासाठी वाट बघावी लागू शकते.
लाभार्थी आकड्यात
जळगाव जिल्ह्यात २ लाख ४० हजार ४७२ लाभार्थी
संजय गांधी निराधार योजनेत ५८ हजार २८४
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत ७८,९०१
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ८९ हजार ४१५
विधवा निवृत्ती वेतन योजना १३,३१४
राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेत ५५८ लाभार्थी आहेत.