भोवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 03:03 PM2019-09-01T15:03:00+5:302019-09-01T15:03:37+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत कौस्तुभ परांजपे...

Good morning | भोवरा

भोवरा

googlenewsNext

दोरीला गुंडाळून भोवरा फिरवण्यात त्यावेळी वेगळी मजा वाटायची. भोवऱ्याभोवती गुंडाळलेली दोरी जेवढ्या जास्त जोरात ओढली जाईल तेवढा जास्त वेळ भोवरा फिरायचा. भोवरा फिरण्यालासुद्धा त्याला असलेली आर (टोकदार खिळा) कशी आहे, ती किती आत किंवा बाहेर आहे, तसेच त्याची जाडी किती आहे हेसुद्धा जबाबदार असते. तसाच तो कोणत्या प्रकारच्या पृष्ठ भागावर फिरतोय यावर त्याचे फिरणे अवलंबून असते. त्यामुळे तो जोरात फिरला तरी काही वेळा एका जागेवर स्थिर असतो, तर काही वेळा क्षणाक्षणाला जागा बदलतो. तसेच आपल्या स्वत:भोवती फिरताना काही वेळा ईतर गोष्टींभोवतीसुद्धा फिरतो असे लक्षात येते.
सगळे भोवरा कसा फिरतो किंवा तो कसा फिरवावा हे सांगण्यासाठी नाही तर आपले आयुष्यसुद्धा या भोवºयासारखेच आहे हे जाणवले म्हणून लिहीत आहे.
भोवरा फिरण्यासाठी जशी एका दोरीची गरज असते व ती दोरी भोवºयाभोवती गुंडाळावी लागते त्याशिवाय भोवरा फिरत नाही. तसेच माणसाचेही आहे. माणूस एक भोवरा आहे व तो दिवसभर आपल्याच समस्या सोडवायला फिरत असतो. रात्री अंथरुणावर पडल्यावर मात्र त्याचे त्या दिवसासाठीचे फिरणे थांबते.
सकाळी उठल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी, समस्या याला तो तोंड देत असतो. अगदी आॅफिस, व्यवसाय या ठिकाणी निघणे, रहदारी, प्रवास साधने, पार्किंग समस्या, मुलांना शाळेत दाखल करण्यापासून त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत कसे शिकवावे याचा विचार, तरुण असेल तर नोकरी व व्यवसायाचा भेडसावणारा प्रश्न, थोडे स्थिरावले असतील तर कर्जाने घेतलेले घर, दुचाकी, चारचाकी, टीव्ही, फ्रिज यासारख्या वस्तुंच्या हप्त्यांची पगाराशी किंवा उत्पन्नाशी घातलेली सांगड.
परिवारात असलेले कार्यक्रम, आजारपण, ज्येष्ठांचा सांभाळ या करता करावी लागणारी धावपळ. सुट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचे ठरविले असेल तर त्यासाठी केलेली आर्थिक तडजोड. याशिवाय बदलीची नोकरी असल्यास ठरावीक काळाने होणारी बदली त्यानंतर परत बसवलेली संसाराची घडी, याशिवाय कामाचे तास, त्या ठिकाणच्या अडचणी, त्रास, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केलेली धावपळ, अंतर्गत स्पर्धा यातही हल्ली नवरा बायको दोघेही काम करणारे असतात. त्यामुळे काही वेळा समस्यांमध्ये वाढ होत असते. या सर्व गोष्टी म्हणजे आपल्याभोवती असलेली व आपल्याला गुंडाळली जाणारी दोरी होय आणि ही दोरी ओढल्या गेल्यावर या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी माणूस भोवºयासारखा सतत आपल्याभोवती फिरत असतो. यातील काही समस्या रोज सुटतात तर रोज पुन्हा नव्याने निर्माण होतात, तर काही सुटण्यास बराच काळ लागतो. त्यातच माणसाचे दिवस, आठवडे, महिने, वर्षे संपत असतात. अशी अनेक वर्षे काढल्यावर जेव्हा तो स्थिरावल्यासारखा वाटतो तेव्हा माणूस नावाच्या भोवºयाची फिरण्याची गती कमी झालेली असते. नंतर तो फिरायचा थांबतो. पण असे थांबल्यानंतर त्याच्या लक्षात येते. या स्वत:सह परिवाराभोवती फिरण्यात त्याच्या आयुष्याची जवळपास ६० वर्षे संपत आलेली आहेत आणि आता तो समस्यांचा दोरीचा जोर कमी झाला म्हणून नाही तर थकलाय म्हणून थांबलाय...
-कौस्तुभ परांजपे, जळगाव
 

Web Title: Good morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.