गुड मॉर्निंग टीचर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:38+5:302021-06-16T04:21:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवा गणवेश... नवी पुस्तके... शाळेत जाण्यासाठी चाललेली चिमुकल्यांची धावपळ आणि ...

Good morning teacher ... | गुड मॉर्निंग टीचर...

गुड मॉर्निंग टीचर...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवा गणवेश... नवी पुस्तके... शाळेत जाण्यासाठी चाललेली चिमुकल्यांची धावपळ आणि उत्‍सुकता... उन्हाळी सुटीनंतर मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी ओढ... नव्या वर्गात प्रवेश आणि नव्या टीचरबद्दल आदरयुक्त भीती, असे सारे चित्र दरवर्षी साधारणपणे १५ जून रोजी दिसते. पण, मागील वर्षाप्रमाणे यंदाही या साऱ्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडले. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू होण्याचा मुहूर्त साधत मंगळवारी शहरासह जिल्ह्यातील शाळा ऑनलाइन भरविण्यात आल्या.

कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावून शिक्षण देण्याचा धोका पत्‍करणे योग्य नसल्याची बाब शिक्षक, पालक संघटना तसेच शिक्षण तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे मंगळवारी नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली, पण, ती ऑनलाइन पध्दतीने. झूम, गूगलमीट, तसेच स्वनिर्मित अ‍ॅपच्या माध्यमातून शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ओळख करून देत ऑनलाइन शिक्षणाबाबतची माहिती दिली. याबरोबरच विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देत, गोष्टी सांगत वर्ग भरले.

अशी झाली पूर्वतयारी...

शाळा ऑनलाइन भरणार असल्याची पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना असल्याने त्यांनीही मोबाईल, टॅब, संगणक तसेच लॅपटॉपची आधीच जमवाजमव केली होती. शाळांमध्ये पालक, शिक्षक, कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्या बैठकाही घेण्‍यात आल्या. दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, अशा विद्यार्थ्यांची माहिती आधी गोळा करून त्यांच्यापर्यंत शिक्षकांनी स्वत: जाऊन अभ्यास घेतला.

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप पुन्हा अ‍ॅक्टिव्ह

शाळांमध्ये इयत्तानिहाय विद्यार्थ्यांचे व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करण्‍यात आले आहेत. यु-टयूब, ऑडिओ, व्हिडिओ क्लिपद्वारे मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांनी ओळख करून दिली. नंतर शाळेबाबत आणि वेळापत्रकाचीही माहिती देण्यात आली, विद्यार्थी घरी असले तरी, त्यांना शाळेत असल्यासारखे वाटले पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेले शाळांचे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप पुन्हा अ‍ॅक्टिव्ह बनले असून त्यावर गुड मॉर्निंग टीचर... म्हणत विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

पाठ्यपुस्तकांचे वाटप

अद्याप मोफत पुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झालेली नाहीत. त्यातच अभ्यासक्रमात कुठलाही बदल झालेला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वाटलेली पुस्तके गोळा करून त्यांचाच पुनर्वापर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या होत्या. त्याप्रमाणे महिनाभरापूर्वी निकाल देण्याच्यावेळी पुस्तके शाळांनी गोळा करून घेतली होती. ती पुस्तके मंगळवारी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना देण्यात आली.

शकुंतला विद्यालयात ऑनलाइन संवाद साधून नवीन वर्षाची सुरुवात

शकुंतला जे. प्राथमिक विद्यालय येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसोबत गूगल मीटच्या साहाय्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत करण्यात आले. पालकांसोबतही चर्चा झाली. पूर्वतयारीविषयी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर यु ट्यूब, झूम आदी विविध माध्यमातून अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना सुविधा नाहीत, त्यांच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने कृती पुस्तिका दिल्या जातील, अशी माहिती राहुल चौधरी यांनी पालकांना दिली. ऑनलाइन कार्यक्रमात मुख्याध्यापिका नेहा जंगले, स्वाती जंगले, लक्ष्मी भालेराव आदी उपस्थित होते.

औक्षण करून विद्यार्थ्यांचे घरीच स्वागत

ब. गो. शानभाग विद्यालयात इयत्तेनुसार आणि वर्गानुसार विद्यार्थ्यांचे व्हॉट्स अ‍ॅपचे आणि टेलिग्रामचे ग्रुप बनवून त्यानुसार पालकांना आणि विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरीच आई, ताई, मावशी, आजी किंवा आत्या यांच्यापैकी जे उपस्थित असतील त्यांच्याहस्ते कुमकुम तिलक लावून व औक्षण करून, खडीसाखर देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी इंटरनेट, झूम अ‍ॅप आणि गूगल क्लासरूमच्या माध्यमातून अध्ययनाचे बनविलेले व्हिडिओ आणि पीपीटी अपलोड करून विद्यार्थ्यांना अध्यापन केले. यासाठी शिक्षकांना शालेय व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे, तसेच विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

पद्मालया इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरसोली

पद्मालया इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरसोली येथे पहिल्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्राचार्या स्वाती चाैधरी यांनी शाळेकडून इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ॲपबाबत माहिती दिली. तसेच नवीन शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशाची माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षक हेमंत नेमाडे, आशिष तेलगोटे, मनीष पाटील, ज्योती पाटील, ज्योती लाेखंडे, प्रतिभा शिवरामे, सुनंदा बारी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

ऑनलाइन तासिकांबाबत मार्गदर्शन

प्रगती शाळेत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांना या शैक्षणिक वर्षात कशा पद्धतीने ऑनलाईन तासिका होतील, याविषयीची माहिती व सूचना देण्यात आल्या. नवीन वर्षात प्रवेश करताना मागील वर्षाची उजळणी कशा पद्धतीने करावी, याविषयी संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी माहिती दिली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

मंगळवारी शाळेच्या पहिल्या दिवशी जळकेतांडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घरी जाऊन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भंगू चव्हाण, इंदू चव्हाण, मुख्याध्यापक सुरेश ढाके, शिक्षक सोमनाथ पाटील, बाळू चव्हाण आदींची उपस्थिती होती.

गाणी, गोष्टींनी अध्यापनाला सुरुवात

कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यमिक विद्यालयात शाळेचा पहिला दिवस ऑनलाइन प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. वर्गशिक्षकांनी झूम मीटिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी नरेंद्र वारके, नीलेश नाईक, श्रीकांत पाटील, राहुल धनगर, उज्ज्वला जाधव, वंदना नेहते, रशिदा तडवी, सुवर्णा सोनार, संगीता निकम, ज्योती सपकाळे, छाया पाटील, स्वाती याज्ञिक आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Good morning teacher ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.