मद्यप्रेमींना खूषखबर : शिल्लक मद्यसाठा विक्रीस परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 12:10 PM2020-05-20T12:10:48+5:302020-05-20T12:10:58+5:30
जळगाव : लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीस काही निर्बंध असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य प्रेमींसाठी मंगळवारी दिलासा देणारा निर्णय घेतला. ...
जळगाव : लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीस काही निर्बंध असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य प्रेमींसाठी मंगळवारी दिलासा देणारा निर्णय घेतला. लॉकडाउन काळात परमीट रुम व बियर बारमधील अर्थात २४ मार्चपासून सील केलेला मद्यसाठा विक्री करण्यास परवानगी दिली आहे. या विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी हे आदेश काढले.
मद्यसाठा विक्री करताना बारमध्ये बसून मद्यप्राशन करण्यास मात्र मनाई करण्यात आली आहे. केवळ शिल्लक साठा ग्राहकांना विक्री करायचा आहे. ही परवानगी शिल्लक असलेला मद्यसाठा विक्री होईपर्यंतच आहे. मद्यसाठा संपेपर्यंत किंवा लॉकडाउन कालावधी यापैकी जे अगोदर होईल, त्यासाठी लागू राहील. मद्यविक्री करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घेणे परवानाधारकांना बंधनकारक राहणार आहे.
याच काळात परमीट रुमधारक बियर साठा बियरशॉपी चालकास विक्री करू शकणार आहे, ती मात्र एकदाच करता येणार आहे. नवीन मद्यसाठा आणून त्याची विक्री करता येणार नाही असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांना विचारले असता, त्यांनी शासनाच्या या नव्या आदेशाबाबत दुजोरा दिला आहे. दरम्यान जिल्हास्तरावर आदेशाची प्रत रात्री उशिरा प्राप्त झाली.