रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; महाराष्ट्र एक्सप्रेस व शटलची वेळ पूर्ववत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2023 10:24 PM2023-10-06T22:24:06+5:302023-10-06T22:25:11+5:30
दोन्ही गाड्यांच्या वेळा पूर्ववत करण्याच्या सुचना दिल्या आहे.
भूषण श्रीखंडे, जळगाव : कोरोनानंतर महाराष्ट्र एक्स्प्रेस व शटल गाडीच्या वेळेमध्ये बदल झाले होते. त्यामुळे चाळीसगाव, पाचोरा येथून जळगावला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. या समस्येबाबत खासदार उन्मेश पाटील यांनी रेल्वे राज्य मंत्री यांची भेट घेवून निवेदन दिले होते. परंतू याबाबत निर्णय न झाल्याने अखेर खासदार पाटील यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दोन्ही गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी गांभीर्य लक्षात घेवून दोन्ही गाड्यांच्या वेळा पूर्ववत करण्याच्या सुचना दिल्या आहे.
महाराष्ट्र एक्सप्रेस (११०३९) व शटल (११११३) गाड्यांची वेळ पूर्ववत करण्याबाबत बाबत खासदार उन्मेश पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांची यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले होते. मात्र तरी देखील याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने खासदार उन्मेश पाटील यांनी शुक्रवार ६ रोजी दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या दोन्ही गाड्यांबाबत गांभीर्य लक्षात आणून तातडीने या वेळेत बदल करावा अशी मागणी केली. यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दोन्ही गाड्यांच्या वेळा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहे. या गाड्या पूर्वी प्रमाणे धावणार असल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, पालक, अधिकारी कर्मचारी व्यापारी जेष्ठ नागरिक यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
या गाड्यांना ही मिळावा थांबा..
पुणे येथे जाणाऱ्या गाड्यांना खान्देशातील प्रवाशांसाठी नविन थांब्याना मान्यता मिळावी, पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद बरोली एक्सप्रेसला (१९८४३/४४) हिला धरणगाव थांबा, हिसार सिकंदराबाद एक्सप्रेस(२२७३७/३८ )धरणगाव थांबा, खान्देश एक्सप्रेस (१९००३/०४) वापी व धरणगाव थांबा, तसेच अमळनेर येथे चेन्नई जोधपूर एक्सप्रेस (२२६६३/६४) साठी रेल्वेची तत्वतः मान्यता कायम करावी. तसेच भुसावळ येथून पुणे जाण्यासाठी नवीन गाडी सुरू करावी, अशी मागणी रेल्वे मंत्री यांच्याकडे केली याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. महिनाअखेर याबाबत बैठक होणार असल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली आहे.