जळगावकरांसाठी गुड न्यूज! जळगावहून मुंबई विमान सेवा लवकरच सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 07:44 PM2024-05-31T19:44:29+5:302024-05-31T19:44:56+5:30
जून महिन्यात या सेवेला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
भूषण श्रीखंडे
जळगाव : भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उडान ५.० योजने अंतर्गत जळगावविमानतळावरून एप्रिल महिन्यात गोवा, हैद्राबाद तसेच २७ मे पासून पुणे विमानसेवा ‘फ्लाय ९१’या विमान कंपनीकडून सुरू आहे. त्यात आता मुंबई-जळगाव अशी विमान सेवा भारत सरकारच्या ‘अलायन्स’ या विमान सेवा कंपनीकडून लवकरच सुरू होणार आहे. याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हिरवा कंदील शुक्रवारी मिळाला असून अंतिम मंजूरीची प्रक्रिया सुरू असल्याने जून महिन्यात या सेवेला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
जळगावकरांना लगेच गाठता येणार मुंबई
जळगावातील अनेकांना मंत्रालयात, व्यापार तसेच अन्य कामानिमित्त मुंबईला रेल्वे किंवा ट्रॅव्हलने जावे लागत असते. परंतू ८ ते १० तास प्रवास करून काम आटोपून पुन्हा लगेच रेल्वे व ट्रॅव्हलने प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई-जळगाव विमान सेवा सुरू झाल्यावर अर्धा ते एक तासात मुंबई गाठता येणार आहे.
व्यापाऱ्यांसाठी सेवा फायदेशीर
जळगावातील व्यापाऱ्यांना बऱ्याचवेळा मुंबईला व्यापार व उद्योग वाढीबाबत जावे लागत असते. परंतू मुंबईच्या प्रवासात अधिक वेळ जात असल्याने व्यापारी वर्गाकडून मुंबई-जळगाव विमान सेवा सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मागणी केली जात होती. या मागणीनुसार अलायन्स विमान कंपनीकडून मुंबई-जळगाव विमान सेवेला मान्यता मिळाली असून जून महिन्यात ही विमान सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना या सेवेचा मोठा फायदा मिळणार आहे.
भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने 'अलायन्स एअर' या विमान कंपनीला जळगाव विमानतळावरून मुंबईची विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे जळगावकरांसाठी व्यापार व उद्योग वाढीच्या दुष्टीकोनातून आनंदाची बाब आहे. गोवा व पुणे पाठोपाठ मुंबईचींही विमानसेवा सुरू होत असल्यामुळे, जळगावच्या हवाई सेवेला विशेष महत्व प्राप्त होणार आहे. - सुनीत कोठारी, अध्यक्ष, नागरी विमान वाहतुक समिती आणि जनसंपर्क समिती औरंगाबाद पर्यटन विकास प्रतिष्ठान.
जळगाव विमानतळावरून आता मुंबई विमान सेवा देखील सुरू होणार आहे. या विमान सेवेसाठी चांगला स्लॉट मिळायला हवा जेणेकरून मुंबईला जाणारे व्यक्ती काम करून लगेच पुन्हा परत येऊ शकतील. - पुरूषोत्तम टावरी, कॅटचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष