गुड न्यूज : स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे ४०० दिवसआधी होणार निदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:53 AM2023-10-05T05:53:10+5:302023-10-05T05:55:58+5:30
जळगावचे सुपुत्र डॉ. अजित गोयंका यांचे संशोधनपर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ मॉडेल ठरणार जगभरासाठी दिलासादायी
जळगाव : ‘सायलेंट किलर’ म्हणून दहशत माजविणाऱ्या कर्करोगाशी निगडित दिलासादायी ‘मॉडेल’ जळगावच्या सुपुत्राने अमेरिकेत विकसित केले आहे. डॉ. अजित गोयंका यांनी विकसित केलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) मॉडेलच्या माध्यमातून स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे ४०० दिवस आधीच निदान होणार आहे. डॉ. गोयंका यांचे संशोधनपर्व जगभरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
जळगावात शिक्षण घेतलेले आणि ‘एम्स’च्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशात अव्वल ठरलेले डॉ. गोयंका वैद्यकीय शिक्षण आटोपून ते संशोधनासाठी अमेरिकेत गेले. त्यांनी स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा अभ्यास सुरू केला. या आजाराचे लक्षणे, उपचार पद्धतीचे बारकाव्यांचे नीट निरीक्षण केले. आणि या गंभीर या आजाराविषयी ‘अलर्ट’ देणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी अभ्यास सुरू केला. त्यानुसार त्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ मॉडेल विकसित केले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता’ मॉडेल
कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा वेळेवर शोध घेण्यासाठी कृतिक्षम बुद्धिमत्ता प्रदान करत आहे. हे मॉडेल सध्या स्वादुपिंडापुरते मर्यादित असले तरी, मधुमेहासारख्या इतर जुनाट आजारांसाठी ते विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहोत.
- डॉ. अजित गोयंका,
मेयो क्लिनिक व वरिष्ठ कर्करोग
विशेषज्ञ संशोधक, अमेरिका.
‘एआय’ देणार ‘अलर्ट’
डॉ. गोयंका यांच्या ‘मॉडेल’नुसार गंभीर लक्षणे समजण्यापूर्वीच १८ ते ३६ महिने आधी स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान होणार आहे. लक्षणे नसतानाही ४३८ दिवसांआधी स्वादुपिंडात गाठ झाली आहे का, याचीही सुस्पष्टता या ‘मॉडेल’च्या माध्यमातून होणार आहे. स्वादुपिंडाचा पोत नाजूकसा, तेवढाच टणकही असतो. त्यामुळे नाजूकतेपासून तर टणकतेपूर्वी असलेल्या घनतेविषयीदेखील या ‘मॉडेल’च्या माध्यमातून परिपूर्ण माहिती मिळणार आहे.
तीन हजार नमुन्यांची चाचपणी
डॉ. गोयंका यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ मॉडेलची तांत्रिकदृष्ट्या बांधणी करण्यापूर्वी तब्बल ३ हजार रुग्णांचे सिटी स्कॅन केले. त्यापैकी १,१०५ जणांचे स्वादुपिंडाचे होते. तर अन्य १,९०९ अन्य व्याधींचे होते. या निदानानंतरच डॉ. गोयंका यांनी ‘मॉडेल’ला विकसित केले आणि या मॉडेलच्या माध्यमातून निर्दोष निदानही होत गेले.