जबरदस्त, जळगावसाठी ‘आयबीएम’ इच्छूक!

By अमित महाबळ | Published: September 10, 2023 07:10 PM2023-09-10T19:10:59+5:302023-09-10T19:12:54+5:30

जळगाव जिल्हा प्रशासन आणि आयबीएम स्किलबिल्ड (सीएसआर बॉक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात सीएसआर उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

good news tech firm 'IBM' is willing for Jalgaon! | जबरदस्त, जळगावसाठी ‘आयबीएम’ इच्छूक!

जबरदस्त, जळगावसाठी ‘आयबीएम’ इच्छूक!

googlenewsNext

जळगाव : आयटीचे दिवस आहेत, दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. साहजिकच या क्षेत्रातील चांगल्या संधींच्या शोधात जिल्ह्यातील अनेक मुलंमुली मुंबई, पुणे आणि दक्षिणेतील शहरांच्या वाऱ्या करायली लागली आहेत. जे बाहेर जाऊन स्थिरावले, ते आहेतच मात्र, ‘आयबीएम’सारख्या जगप्रसिद्ध कंपनीने जळगाव जिल्ह्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. ही कंपनी सीएसआर निधीतून जिल्ह्यातील मुलामुलींना मोफत प्रशिक्षण देणार आहे. याचा पुढे जाऊन कंपनीला देखील फायदा होणार आहे.

जळगाव जिल्हा प्रशासन आणि आयबीएम स्किलबिल्ड (सीएसआर बॉक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात सीएसआर उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. आयबीएम कंपनीतर्फे तनवी शाह यांनी आयबीएम स्किलबिल्ड अंतर्गत सीएसआर व एज्युकेशन या उपक्रमाची माहिती दिली. यामध्ये जळगावची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीद्वारे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार तयार करण्यात आलेल्या तांत्रिक व व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध प्रकारच्या मोफत प्रशिक्षणांविषयीही माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. महाविद्यालयांच्या गरजेनुसार आयबीएम स्किलबिल्ड आणि सरकारी उपक्रमांचा लाभ व एकत्रीकरण यावरही चर्चा करण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यावरही काही सूचना महाविद्यालयांकडून करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आयबीएमच्या तनवी शाह यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांसाठी प्रशिक्षण उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सामंजस्य करार केला. तसेच आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रशासनाच्या वतीने महात्मा गांधी नॅशनल फेलोशिपचे फेलो (एमजीएनएफ) दुशांत बंबोडे, शासकीय तंत्रनिकेतन, जळगावचे प्राचार्य डॉ. पराग पाटील, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. हर्षल नेमाडे, रायसोनी कॉलेजचे अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. संजय शेखावत, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगावचे प्रा. महेश सदावर्ते, आयएमआर कॉलेजच्या प्रतिनिधी प्रा. डॉ. वर्षा पाठक आदी उपस्थित होते.


समन्वयक नियुक्त

जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन जळगावची निवड करण्यात आली असून, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव या संस्थेचे प्राचार्य डॉ. पराग पाटील यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

असे आहे प्रशिक्षण

आयबीएम स्किलबिल्ड (सीएसआर बॉक्स) मार्फत कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण (स्किल बिल्डिंग) देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ऑनलाइन, ऑफलाइन, हायब्रीड स्वरुपात असून, इंटर्नशिपचा देखील समावेश आहे.

महाराष्ट्रात जळगावपासून सुरुवात

कंपनीमार्फत या आधीपासून आसाम, गुजरात, पंजाब राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. आता त्याची सुरुवात महाराष्ट्रातील जळगावपासून होणार आहे. पहिला करार जळगाव जिल्हा प्रशासनाशी झाला आहे. पुण्यातही काही महाविद्यालयांशी चर्चा सुरू आहे, असे तनवी शाह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: good news tech firm 'IBM' is willing for Jalgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.