खुशखबर...यंदा जळगावकरांवर नाही जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:05 PM2018-04-03T19:05:10+5:302018-04-03T19:05:10+5:30
जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.३ - शहराला पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणात सध्यस्थितीला ४८ टक्के जलसाठा शिल्लक असून, जळगावकरांना जुलैपर्यंत पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही अशी शक्यता आहे.
दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरु राहणार
शहरात सध्या दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिली. वाघूर धरणात सध्या पुरेसा जलसाठ्यामुळे जुलैपर्यंत तरी पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही. दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. उन्हाची दाहकता यंदा जास्त असल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्या दृष्टीने मनपा पाणी पुरवठा विभागाने वाघूर धरणातील जलसाठ्याचा नुकताच आढावा घेतला.
गेल्या वर्षाच्या तुलनेत घट
सध्यस्थितीला पुरेसा जलसाठा वाघूरमध्ये असला तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २० टक्कयांची घट दिसून येत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात धरणात ७८ टक्के जलसाठा होता. मात्र, यंदा केवळ ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापमानाचे प्रमाण जास्त असल्याने जलसाठ्यात घट होत असल्याचा अंदाज मनपा पाणी पुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.